Disney Plus Hotstar ला मोठा झटका; आता Jio Cinema वर पाहता येणार एचबीओ कंटेंट, Reliance-HBO मध्ये डील
दरम्यान, डिस्ने प्लस हॉटस्टारने आपले लक्ष दक्षिण भारतीय सिनेमा आणि मालिकांकडे वळवले असल्याची माहितीही मिळाली आहे.
रिलायन्सच्या वायाकॉम18 (Viacom18) ने आपला स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म जिओ सिनेमा (JioCinema) साठी वॉर्नर ब्रदर्ससोबत मोठा करार केला आहे. या डीलद्वारे वॉर्नर ब्रदर्ससह, एचबीओ कंटेंट (HBO Content) रिलायन्सच्या जिओ सिनेमा अॅपवर दर्शकांसाठी उपलब्ध असेल. हा कंटेंट पुढील महिन्यापासून जिओ सिनेमावर स्ट्रीम केला जाईल. वायाकॉम18चा ओटीटी प्लॅटफॉर्म ‘जिओ सिनेमा’वर एचबीओ कंटेंट दाखवली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. या करारामुळे, जिओ सिनेमा हॉलिवूड कंटेंटच्या बाबतीत Netflix आणि Amazon शी स्पर्धा करण्यासाठी बाजारात उतरली आहे.
आता जिओ सिनेमावर जो कंटेंट उपलब्ध होणार आहे त्यामध्ये अनेक लोकप्रिय हॉलीवूड चित्रपट, सक्सेशन, गेम ऑफ थ्रोन्स, लॉर्ड ऑफ द रिंग्स, हॅरी पॉटर सिरीज समावेश आहे. यासोबतच HBO Originals, Max Originals आणि Warner Bros टेलिव्हिजन सिरीजदेखील 1 मे पासून जिओ सिनेमावर प्रीमियरसाठी सज्ज आहेत. ओटीटी विश्वात ही एक मोठी आणि महत्वाची डील मानली जात आहे.
यापूर्वी डिस्ने+ हॉटस्टारवर एचबीओ कंटेंट उपलब्ध होता, परंतु 31 मार्चपासून हा कंटेंट काढून घेतला जाईल. दुसरीकडे वॉर्नर ब्रदर्स अॅमेझॉन प्राइम आणि हॉटस्टारला त्यांचा सर्वाधिक लोकप्रिय कंटेंट देऊ शकणार नाहीत. तज्ञांच्या मते, ही जिओ आणि वॉर्नर ब्रदर्स यांची ही अशी भागीदारी आहे, ज्याद्वारे जिओ सिनेमा वॉर्नर ब्रदर्स आणि एचबीओचे दुसरे घर बनेल. अद्याप या डीलवर वॉर्नर ब्रदर्स आणि वायाकॉम18 कडून कोणतेही विधान आलेले नाही. (हेही वाचा: IB 71 Trailer Released: विद्युत जामवालच्या नवीन चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, Spy Agent बनून लावणार जीवाची बाजी)
वायाकॉम18 ने 2023 ते 2027 या कालावधीत सुमारे $2.9 बिलियन मध्ये आयपीएलचे डिजिटल स्ट्रीमिंग अधिकारही विकत घेतले आहेत, जे आधी डिस्ने हॉटस्टारकडे होते. दरम्यान, डिस्ने प्लस हॉटस्टारने आपले लक्ष दक्षिण भारतीय सिनेमा आणि मालिकांकडे वळवले असल्याची माहितीही मिळाली आहे. दक्षिण भारतीय मूळ चित्रपट आणि मालिका बनवण्याची ओटीटीची योजना असल्याचे सांगितले जात आहे.