Awards Received by Lata Mangeshkar: 'मेरी आवाज ही पेहचान है...'; जाणून घ्या लता मंगेशकर यांना मिळालेले काही महत्वाचे पुरस्कार

इतक्या प्रदीर्घ कारकीर्दीमध्ये लता दिदींना अनेक महत्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आज त्यातल्याच काही महत्वाच्या पुरस्कारांबाबत आम्ही माहिती देत आहोत

Lata Mangeshkar (Photo Credits: Getty)

आपल्या सुरेल आवाजाने, गायनाने अनेक दशके देशावर राज्य करणाऱ्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे निधन झाले आहे. 'भारतरत्न' पुरस्काराने गौरविलेल्या लता मंगेशकर यांनी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या 92 वर्षांच्या होत्या. जगभरात 'नाइटिंगेल ऑफ इंडिया' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांनी जवळपास पाच दशके हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या गायनाचा ठसा उमटवला. लता दीदी यांनी 1942 मध्ये वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि आतापर्यंत अनेक भारतीय भाषांमध्ये 30 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.

आज लता दीदी आपल्यात नाहीत परंतु आपल्या गाण्यांमुळे त्या नेहमीच अजरामर राहतील. इतक्या प्रदीर्घ कारकीर्दीमध्ये लता दिदींना अनेक महत्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आज त्यातल्याच काही महत्वाच्या पुरस्कारांबाबत आम्ही माहिती देत आहोत.

लता मंगेशकर यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. याशिवाय त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय भारताच्या स्वातंत्र्याच्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त 2008 साली त्यांना ‘वन टाइम अवॉर्ड फॉर लाइफटाइम अचिव्हमेंट’ सन्मान प्रदान करण्यात आला. राज्य सरकारने त्यांना 1997 साली महाराष्ट्र भूषण व 2001 मध्ये महाराष्ट्र रत्न (प्रथम प्राप्तकर्ता) पुरस्काराने सन्मानित केले.

1956 मध्ये शंकर जयकिशन यांच्या ‘चोरी चोरी’ चित्रपटातील 'रसिक बलमा' या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. परंतु या पुरस्कारांमध्ये पार्श्वगायिका श्रेणी नसल्याच्या निषेधार्थ लतादीदींनी ते लाईव्ह गाण्यास नकार दिला. शेवटी 1959 मध्ये पार्श्वगायन श्रेणी सुरू करण्यात आली. मात्र पुरुष आणि महिला गायकांसाठी वेगळे पुरस्कार नंतर सुरू करण्यात आले. 1959 ते 1967 या काळात लता मंगेशकर यांची सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कारावर मक्तेदारी होती.

सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका म्हणून त्यांच्या तब्बल 15 गाण्यांना बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशन पुरस्कार प्राप्त झाला आहे. जगभरातील विविध 8 विद्यापीठांच्या कडून त्यांना ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ पदवी मिळाली आहे.

इतर पुरस्कार -

1974 - सर्वाधिक गाणी गायल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

1980 - दक्षिण अमेरिकेतील सुरीनाम प्रजासत्ताकचे मानद नागरिकत्व

1985 - टोरंटो, ओंटारियो, कॅनडा येथे त्यांच्या आगमनाच्या सन्मानार्थ 9 जून हा ‘आशिया दिन’ म्हणून घोषित करण्यात आला

1987 - ह्यूस्टन, टेक्सास येथे युनायटेड स्टेट्सचे मानद नागरिकत्व

1990 - श्री राजा-लक्ष्मी फाउंडेशन, चेन्नई तर्फे राजा-लक्ष्मी पुरस्कार

1996 - राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार

1996 - स्टार स्क्रीन जीवनगौरव पुरस्कार

1997 - राजीव गांधी पुरस्कार

१९९८ - साउथ इंडियन एज्युकेशनल सोसायटीचा जीवनगौरव पुरस्कार

1999 - NTR राष्ट्रीय पुरस्कार

2000 - आयफा जीवनगौरव पुरस्कार

2000 - चतुरंग प्रतिष्ठानतर्फे जीवन गौरव पुरस्कार

2001 - नूरजहान पुरस्कार (प्रथम प्राप्तकर्ता)

2002 - वर्षाचा 'स्वररत्न' सह्याद्री नवरत्न पुरस्कार.

2002 - हकीम खान सूर पुरस्कार (महाराणा मेवाड फाऊंडेशनतर्फे राष्ट्रीय एकात्मतेसाठी)

2002 - आशा भोसले पुरस्कार (प्रथम प्राप्तकर्ता)

2007 - फॉरएव्हर इंडियन अवॉर्ड

2010 – ‘नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ (फ्रेंच सर्वोच्च नागरी पुरस्कार)

2010 – ‘प्राइड ऑफ इंडिया - कला सरस्वती’ संगीत पुरस्कार

2010 – GIMA चा जीवनगौरव पुरस्कार

2011 - पुणे महानगरपालिकेतर्फे स्वरभास्कर पुरस्कार (प्रथम प्राप्तकर्ता)

2011 - श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्कार.

2020 - TRA च्या मोस्ट डिझायर्ड पर्सनॅलिटी लिस्ट 2020 मध्ये भारतामधील (23 व्या क्रमांकावरील) एकमेव गायक (हेही वाचा: जेव्हा 1983 च्या विश्वचषक विजयानंतर लता मंगेशकर यांनी टीम इंडियासाठी केली मदत, घ्या जाणून)

वरील पुरस्कारव्यतिरिक्त, लतादीदींना सुमारे 250 ट्रॉफी आणि 150 सुवर्ण डिस्क मिळाल्या आहेत. दरम्यान, जानेवारीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर लता मंगेशकर यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना न्यूमोनिया झाला. त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते, परंतु त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर व्हेंटिलेटरचा सपोर्टही काढून घेण्यात आला. मात्र 5 फेब्रुवारीला त्यांची प्रकृती बिघडू लागली आणि त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. अखेर 6 फेब्रुवारीला गानकोकिळेने अखेरचा श्वास घेतला.