Sushant Singh Rajput Demise: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युनंतर अनेक कलाकारांची बॉलीवूडवर सडकून टीका; समोर आले भयानक सत्य, जाणून घ्या कोण काय म्हणाले
दरम्यान, डिप्रेशनमुळे सुशांतने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र इतकी प्रसिद्धी, पैसा मिळूनही सुशांत एकटा होता, ही गोष्ट अनेकांच्या मनाला लागली आहे. यानंतर इंडस्ट्रीमधील एक विदारक सत्य समोर येत आहे.
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची आत्महत्या ही अनेकांना चटका लावून जाणारी आहे. चाहते, आजूबाजूचे लोक, इंडस्ट्रीमधील अनेक मंडळींसाठी हा फार मोठा धक्क आहे. मात्र आता यामुळे एक नवीन प्रश्न जोर धरू लागला आहे, तो म्हणजे इतक्या मोठ्या कलाकाराने आत्महत्या नक्की का केली असावी? सुशांत डिप्रेशनमध्ये होता ही गोष्ट समोर आली आहे, मात्र याला कारणीभूत कोण? काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार गेल्या काही महिन्यांमध्ये सुशांतकडून अनेक चित्रपट काढून घेतले होते, असे का घडले असावे? फक्त सुशांतला इंडस्ट्रीमधील कोणी गॉडफादर नव्हता म्हणून? सुशांतने अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे, मात्र तरी त्याला एकटे पाडण्यात आले. यासाठी एकच कारण सांगितले जात आहे, ते म्हणजे नेपोटीझम (Nepotizm)!
आता याच मुद्द्यावर इंडस्ट्रीमधीलच अनेक कलाकारांनी आपल्याला आलेला अनुभव शेअर केला आहे.
याबाबत कंगना रनौतने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती म्हणते. ‘सुशांतचा मृत्यू हा आत्महत्या नसून ठरवून केलेला खून होता. सुशांत बाहेरचा असल्याने त्याला कोणी इंडस्ट्रीमध्ये सामावून घेतले नाही, त्याला नेहमी कमकुवत समजत राहिले. दुर्दैवाने हीच गोष्ट मनाला लावून घेऊन सुशांतने आत्महत्या केली. माझ्याही बाबतीत असेच घडले. माझ्या चित्रपटांना फ्लॉप समजले गेले माझ्यावर 6 केसेस लावण्यात आल्या.'
त्यानंतर मोहब्बते चित्रपटापासून आपले करियर सुरु करणारी गायिका श्वेता पंडितने आपल्याला असाच अनुभव आल्याचे सांगितले आहे. ती म्हणते, ‘मला इंडस्ट्रीमध्ये 21 वर्षे पूर्ण झाली. या 21 वर्षांत मी अनेक संगीतकारांसोबत काम केले आहे परंतु गेल्या तीन वर्षांत मी बॉलीवूडमध्ये गायले नाही, या 3 वर्षांत माझी साधी विचारपूस करायला कोणीही फोन केला नाही. जर का तुम्ही बाहेरचे असाल तर 'हे' लोक तुम्हाला कधी बाहेर फेकून देतील हे समजणार ही नाही.’ (हेही वाचा: सुशांत सिंह राजपूत याचा अखेरचा सिनेमा 'दिल बेचारा' चित्रपटगृहात प्रदर्शित करा; चाहत्यांची निर्मात्यांकडे मागणी)
आता दबंग (Dabangg) चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप (Abhinav Kashyap) यांनीही एक मोठा खुलासा केला आहे. सलमान खान व त्याच्या कुटुंबाने आपले करियर संपवले असा आरोप अभिनवने केला आहे. याबाबत त्याने एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तो म्हणतो,‘दबंगच्या निर्मितीच्या वेळी माझ्या बाबतीतही असेच घडले होते. अरबाज खान, सोहेल खान आणि त्याच्या कुटुंबीयांनी मला फक्त धमकावलेच नाही, तर यांनी माझ्या कारकीर्दीवरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. यानंतर, माझ्या दुसर्या चित्रपटाचा प्रकल्पही अरबाजने आपली शक्ती वापरुन माझ्याकडून काढून घेतला, ज्यामुळे माझे नुकसान झाले. दबंगच्या रिलीजच्या वेळी माझी नकारात्मक प्रतिमा लोकांसमोर आणून मला कुप्रसिद्धी मिळवून दिली. यासोबत त्यांनी मला निरनिराळ्या मार्गांनी धमकावले. मी पोलिसांकडेही गेलो होतो मात्र काही फायदा झाला नाही.’
अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tandon) ने ही ट्विटरवर बॉलिवूडचे वास्तव मांडले आहे, ती म्हणते, 'मीन गर्ल गँग त्यांचे कॅम्प यांनी अनेकांची चेष्टा केली आहे. नायक, त्याची गर्लफ्रेंड, मागेपुढे करणारे पत्रकार आणि करिअर बिघडवणाऱ्या बनावट मीडिया स्टोरीजनी अनेकांना चित्रपटातून काढून टाकले आहे. कधीकधी यामुळे काहींचे संपूर्ण करिअर बरबाद होते. आपल्याला टिकून राहण्यासाठी संघर्ष करावा लागेल, लढा द्यावा लागेल... काहींना जमते, काहींना नाही.'
याबाबत कोयना मित्रा म्हणते., 'सुशांतच्या मृत्यूवर शोक करणारे लोक तो टीव्ही स्टार असल्याने त्यांची खिल्ली उडवत असत. इंडस्ट्रीमध्ये भेदभाव होतो. जर आपण फॅशन इंडस्ट्रीचे असाल तर, कोणी काही बोलत नाही, मात्र जर तुम्ही टीव्ही इंडस्ट्रीचे असाल, तर लोक म्हणतात की तुम्ही या ठिकाणी योग्य नाही. जॉन अब्राहम, सुष्मिता सेन आणि प्रियंका चोप्रा यांनाही या सर्वांचा सामना करावा लागला होता. काही वर्षांपूर्वी अनेकांनी प्रियंकाच्या बाबतीतही हेच केले पण ती हुशार होती व यातून बाहेर पडली.’
अभिनेता गुलशन देवय्या याने अभिनेत्री मीरा चोप्राच्या ट्विटचा हवाला देत म्हटले आहे की, 'जर कुणाला वाटत असेल की इंडस्ट्री हे कुटूंब आहे, तर तो त्याचा गैरसमज आहे. काम करण्याच्या नावावर इंडस्ट्री हे एक काल्पनिक जग आहे.'
याबाबत अभिनेता प्रकाश राज यांनी लिहिले आहे, 'नेपोटिझम... मी त्यातून गेलो आहे.. मी जिंकलो आहे .. मात्र माझ्या जखमा माझ्या मांसापेक्षा अधिक खोल आहेत .. पण सुशांत सिंह राजपूत यातून तरू शकला नाही... यातून आपण काहीतरी खरच शिकू का? आपण खरच या गोष्टींच्या विरोधात उभे राहू शकतो? आणि अशा स्वप्नांना न मरू देण्यासाठी काही प्रयत्न करू शकू?'
सुशांतच्या निधनानंतर, अनुभव सिन्हा यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘बॉलीवूडच्या प्रिव्हिलेज क्लबने आज रात्री बसून विचार केला पाहिजे. आता नक्की काय ते मला विचारू नका.’
फिल्ममेकर हंसल मेहता यांनी ट्वीट केले की, 'फिल्मी जगात बाहेरून बरेच तरुण आहेत, या सर्वांनी लक्षात ठेवावे की- इथले लोक तुम्ही जोपर्यंत महत्वाचे वाटत आहात तोपर्यंत किंमत देतील, मात्र तुम्ही कमकुवत होताच ते तुम्हाला सोडून देतील. ज्यांनी यापूर्वी तुमचे यश साजरे केले होते, ते काही काळानंतर तुमचे अपयश साजरे करतील.'
दरम्यान, डिप्रेशनमुळे सुशांतने आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र इतकी प्रसिद्धी, पैसा मिळूनही सुशांत एकटा होता, ही गोष्ट अनेकांच्या मनाला लागली आहे. यानंतर इंडस्ट्रीमधील एक विदारक सत्य समोर येत आहे. अनेक कारणास्तव लोक एकमेकांशी बोलत नाहीत, बाहेरच्या कलाकारांना एकटे पाडले जात आहे, याच मुद्द्यावर सध्या चर्चा रंगत आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)