अभिनेत्री Sonakshi Sinha वर लाखो रुपयांचा फसवणुकीचा आरोप; न्यायालयाने जारी केले अजामीनपात्र वॉरंट
प्रमोदने या संपूर्ण प्रकरणाची दोन वेळा मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सोनाक्षी सिन्हावर कलम 420, 406 अंतर्गत आरोपपत्र दाखल केले
मुरादाबाद (Moradabad) येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि तिचा सल्लागार अभिषेक सिन्हा यांच्याविरुद्ध फसवणूक प्रकरणात वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 एप्रिल रोजी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुरादाबादच्या कटघर पोलीस स्टेशन हद्दीतील शिवपुरी येथील रहिवासी प्रमोद शर्मा यांनी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, अभिषेक सिन्हा, मालविका पंजाबी, घुमिल ठक्कर, एडगर साकिया यांच्याविरोधात 22 फेब्रुवारी 2019 रोजी कटघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
यामध्ये आरोप करण्यात आला होता की, फिर्यादीने सोनाक्षी सिन्हाला दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलवण्यासाठी करार केला होता. कार्यक्रमाला येण्यासाठी सोनाक्षी सिन्हाने 29 लाख 90 हजार रुपये आणि तिच्या सल्लागाराने सात लाख पन्नास हजार रुपये घेतले होते. पैसे घेऊनही अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कार्यक्रमाला पोहोचली नाही. प्रमोदने अनेकवेळा अभिनेत्रीचा वैयक्तिक सल्लागार अभिषेक सिन्हा याला कार्यक्रमाला न येण्याचे कारण विचारले आणि त्याचे पैसे परत करण्यास सांगितले. सोनाक्षी किंवा अभिषेक यांच्याकडून काहीही उत्तर मिळाले नाही.
हा खटला मुरादाबाद येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुरू होता, जो अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी चतुर्थ स्मिता गोस्वामी यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी पाठवण्यात आला होता. याआधी कोर्टाने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि इतर आरोपींना नोटीस बजावून समन्स बजावले होते, पण समन्स बजावूनही आरोपी कोर्टात हजर झाले नाहीत. शनिवारी प्रमोद शर्मा त्यांचे वकील पीके गोस्वामी यांच्यासह न्यायालयात बाजू मांडण्यासाठी दाखल झाले. (हेही वाचा: Sonakshi Sinha चे Salman Khan सोबत झाले लग्न? सोशल मीडिया व्हायरल झालेल्या फोटोवर भडकली अभिनेत्री)
या प्रकरणाचा अभ्यास करताना न्यायालयाने आरोपी सोनाक्षी सिन्हा आणि तिचा सल्लागार अभिषेक सिंघा यांच्यावर वॉरंट जारी केले आहे. खटल्यातील उर्वरित आरोपींनी उच्च न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळवला होता. आता या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 25 एप्रिलची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
प्रमोदने या संपूर्ण प्रकरणाची दोन वेळा मुख्यमंत्री पोर्टलवर तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सोनाक्षी सिन्हावर कलम 420, 406 अंतर्गत आरोपपत्र दाखल केले. खटल्याची नोंद झाल्यानंतर सोनाक्षी सिन्हा या प्रकरणासंदर्भात आपले निवेदन नोंदवण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी मुरादाबादला आली होती. दोन तास हॉटेलमध्ये थांबून जबाब नोंदवून ती निघून गेली.