अभिनेत्री कंगना रनौतला मिळाली BJP खासदार सुब्रमण्यम स्वामी यांची साथ; 'Guts' च्या बाबतीत एक नंबर म्हणत, कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासाठी करणार मदत
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनापासून कंगना आपल्या अनेक वक्तव्यामुळे चर्चेत राहिली आहे.
अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) बॉलिवूडमधील घराणेशाही (Nepotism), कंपूशाही यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत हल्ला करत आहे. सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनापासून कंगना आपल्या अनेक वक्तव्यामुळे चर्चेत राहिली आहे. कदाचित ती अशी पहिली सेलिब्रिटी असेल जिने सुशांतचा मृत्यू हा, 'ठरवून केलेला खून', असे म्हटले आहे. कंगनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान बॉलिवूड चित्रपट माफियांवर अनेक शाब्दिक हल्ले केले आहेत. यामध्ये तिने अनेक सेलेब्जची नावे घेऊन ते कसे सुशांतच्या मृत्यूस कारणीभूत होते याची कारणे सांगितली आहे. आता भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी (BJP MP Subramanian Swamy) यांनी कंगनाला उघड पाठींबा जाहीर केला आहे.
सुब्रमण्यम स्वामी ट्वीट -
सोमवारी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी कंगनाला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या एका ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की- 'कंगना रनौत यांच्या कार्यालयाने ईशकरणशी (Ishkaran) संपर्क साधला. कंगनाला कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासाठी कशी मदत करता येईल याबद्दल चर्चा करण्यासाठी इशकरण आणि मी लवकरच तिला भेटू. यासह मुंबई पोलिसांशी कधी भेट घ्यावी यावर चर्चा करू. मला सांगण्यात आले आहे की, कंगना ही हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्टारडमच्या बाबतीत पहिल्या तीन सेलेब्जपैकी एक आहे, पण मी म्हणेन ती गट्स किंवा धाडसाच्या बाबतीत एक नंबर आहे.’ (हेही वाचा: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी कंगना रनौतच्या धाडसाचे केले कौतुक)
एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये कंगनाने अनेक सेलेब्जची नावे घेऊन त्यांनी कशी घराणेशाही पुढे चालू ठेवली याची उदाहरणे दिली आहेत. या मुलाखतीनंतर सध्या सर्वत्र कंगनाच्या बोल्डनेसचीच चर्चा सुरु आहे.
दरम्यान, ईशकरण हे सुब्रमण्यम स्वामी यांनी नियुक्त केलेले वकील आहेत. सुशांत आत्महत्या प्रकरणातील सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास त्यांनी ईशकरण यांना सांगितले आहे, जेणेकरुन आवश्यकतेनुसार या प्रकरणाची सीबीआय चौकशी करता येईल. ईशकरणने सुशांत प्रकरणात उत्तम काम केले आहे. त्यांनी अलीकडेच मुंबई पोलिसांना आवाहन केले आहे की, सुशांतचे घर योग्य पद्धतीने सील करावे आणि त्यांचे सर्व सामन जपून ठेवले पाहिजे.