Sonu Sood Meet Sharad Pawar: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद ने घेतली शरद पवार यांची भेट

गेल्या आठवड्यात अनधिकृत बांधकाम प्रकरणी सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. आज सोनू सूद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं जातयं.

Sonu Sood Meet Sharad Pawar (PC - ANI)

Sonu Sood Meet Sharad Pawar: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) ने आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलं जातयं. यापूर्वी सोनू सूदने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची भेट घेतली होती. दरम्यान, गेल्या आठवड्यात अनधिकृत बांधकाम प्रकरणी सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. सोनू सूद याच्या जुहू येथील सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले होते.

त्यामुळे महापालिकेने याप्रकरणी सोनू सूदविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणानंतर सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयात महापालिकेच्या नोटिशीला आव्हान दिले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने महापालिकेला 13 जानेवारीपर्यंत सोनू सूद विरोधात कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले होते. आज सोनू सूदच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. (वाचा - सोनू सूद आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, पहा काय म्हणाले शिवसेना नेते)

दरम्यान, बीएमसीने सोनू सूद विरोधात केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, सोनू सूद यांनी स्वत: जमिनीच्या वापरावर बदल केला. त्यांनी कोणतीही परवानगी न घेता रहिवासी इमारतीचे हॉटेलमध्ये रुपांतर केलं. यासाठी त्यांनी अथॉरिटीकडून आवश्यक ती परवानगी घेतलेली नाही. बीएमसीकडून पाठवण्यात आलेल्या नोटीशीकडे सोनू सूद यांनी दुर्लक्ष केलं असल्याचा आरोपदेखील अभिनेत्यावर करण्यात आला आहे.

लॉकडाऊन काळात सोनू सूद यांनी गरीबांना तसेच कामगारांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मोठी मदत केली होती. सोनू सूदने हजारो कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवले होते. त्यांच्या या कामाचे संपूर्ण देशभरात कौतुक करण्यात आले. आजही सोनू सूद गरजूंच्या मदतीला धावून जातो. सोनू सूदने आतापर्यंत अनेक आजारी तसेच शिक्षणासाठी पैसे नसलेल्या अनेक गरजू लोकांची आर्थिक मदत केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement