IPL Auction 2025 Live

अनुपम खेर यांच्यानंतर 'एफटीआयआय'ची धुरा नसिरुद्दीन शाह यांच्याकडे?

मात्र, त्यांनी नकार दिल्यामुळे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय नव्या चेहऱ्याच्या शोधात असल्याची चर्चा आहे.

नसिरुद्दीन शाह, अभिनेता (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या पदाची धुरा कोणाकडे जाणार याबाबत उत्सुकता कायम आहे. अद्याप सरकारकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र, या पदासाठी दिग्गजांच्या नावांची चर्चा सुरु झाली आहे. असे असले तरी,अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा सुरु असून, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयही 'एफटीआयआय'च्या अध्यक्षपदासाठी नसिरुद्दीन शाह यांचा विचार करत असल्याची माहिती पुढे येत आहे.

दरम्यान, एफटीआयआयच्या अध्यक्षपदासाठी अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडे विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्यांनी नकार दिल्यामुळे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय नव्या चेहऱ्याच्या शोधात असल्याची चर्चा आहे. नसिरुद्दीन शाह हे एफटीआयआयचे माजी विद्यार्थी असल्यामुळे ते संस्थेशी जोडले गेलेले आहेत. तसेच, विद्यार्थी आणि तेथील वातावरणाशीही ते चांगले परिचीत आहेत. तसेच, त्यांचा परखड स्वभाव आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली जवळीक यामुळे या पदासाठी ते योग्य ठरतील असे अनेकांचे मत आहे. पण, दुसऱ्या बाजूला नसिरुद्दीन शाह यांची एकूण कारकीर्द पाहिली तर, आतापर्यंत त्यांनी कोणत्यही शासकीय नोकरीला शक्य तितके दुरच ठेवले आहे. त्यामुळे एफटीआयआयच्या पदाची ऑफर आल्यास ते ती स्वीकारणार का? याबाबत उत्सुकता आहे. (हेही वाचा, अभिनेते अनुपम खेर यांचा ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा)

माहिती व प्रसारण मंत्रालयाने अनुपम खेर यांची ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी गेल्या वर्षी ११ ऑक्टोबर रोजी नियुक्ती केली होती. मात्र, पदभार स्वीकारल्याच्या वर्षभरातच त्यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा (बुधवार, ३१ ऑक्टोंबर) दिला. विविध कामांतील व्यग्रतेच्या कारणावरुन आपण हा राजीनामा देत असल्याचे खेर यांनी म्हटले होते. ऑक्टोंबर २०१७मध्ये त्यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. एफटीआयआयचे अत्यंत वादग्रस्त ठरलेले अध्यक्ष गजेंद्र चौहाण यांच्याकडून त्यांनी संस्थ्येच्या अध्यक्षपदाची पुढील सूत्रे हाती घेतली होती. मात्र, खेर यांच्या नियुक्तीनंतर विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली होती. भाजपाच्या जवळ असलेल्या व्यक्तींचीच या पदावर नियुक्ती होत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला होता. त्यामुळे खेर यांच्या राजीनाम्यामागे हेही एक प्रमुख कारण असल्याची चर्चा आहे.