सोनेरी Porsche गाडीवर या देशाने घातली बंदी; वाचा काय आहे कारण

पोर्शे गाडी चालवणाऱ्या एका चालकावर कारवाई करण्यात आली आहे, इतकेच नाही तर कोणताही नियम मोडला नसला तरी ही पोर्शे गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली होती.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : YouTube)

पोर्शे (Porsche) ही आजही जगभरातील तमाम कारप्रेमींची आवडती कार आहे. आजही ही गाडी संपत्तीचे, श्रीमंतीचे लक्षण मानले जाते. या गाडीच्या बाबतीत जर्मनीमध्ये एक अजब प्रकार घडला आहे. जर्मनीमध्ये पोर्शे गाडी चालवणाऱ्या एका चालकावर कारवाई करण्यात आली आहे, इतकेच नाही तर कोणताही नियम मोडला नसला तरी ही पोर्शे गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली होती. यामागचे कारण म्हणजे ही गाडी सोनेरी रंगाने रंगवली होती. या रंगामुळे इतर चालकांच्या जीविताला धोका पोहचू शकतो म्हणून पोलिसांनी ही सोनेरी रंगाची पोर्शे गाडी रस्त्यावर न चालवण्याची तंबी दिली आहे.

तर 31 वर्षीय चालकाला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पकडले. या चालकाला त्याच्या गाडीचे पॉलिश (रंग) काढून परत गाडी रजिस्टर करण्यास सांगितले. या सोनेरी रंगामुळे इतर चालकांचे डोळे दिपत आहेत, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे हे कारण देण्यात आले. चालकाने ही गोष्ट मान्य करून तो निघून गेला. मात्र परत काही दिवसांनी या चालकाला पकडण्यात आले. यावेळी त्याची गाडी गॅरेजमध्ये घेऊन जाण्यापूर्वी परवाना, लायसन्स प्लेट आणि कारच्या किल्ल्या पोलिसांनी काढून घेतल्या. (हेही वाचा: 'महिंद्रा'ने सादर केली जगातील सर्वात वेगवान कार; 2 सेकंदात पकडणार 100 KPH गती, पहा वैशिष्ठ्ये)

त्यानंतर दंड घेऊन या चालकाला सोडण्यात आले. मात्र आता जो पर्यंत हा चालक या गाडीचा रंग काढून टाकणार नाहीत, तो पर्यंत तो ही गाडी अधिकृतरित्या रस्त्यावर चालवू शकणार नाही. दरम्यान भारतातही पोर्शे गाडीची बरीच क्रेझ आहे. आता पोर्शे कार मेकर्स आपली नवीन जनरेशन मॅकन (Macan) भारतामध्ये जुलैपर्यंत सादर करणार आहेत. कंपनी या एसयूव्ही गाडीला दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करणार आहेत.