UK’s Contaminated Blood Scandal: यूकेमध्ये दूषित रक्त घोटाळा; तब्बल 30,000 जणांना रोगांची लागण, 3,000 लोकांचा मृत्यू, जाणून घ्या सविस्तर
या घातक आरोग्य घोटाळ्याच्या सार्वजनिक अहवालात असे उघड झाले आहे की, अधिकारी आणि सार्वजनिक आरोग्य सेवेला याबाबत माहिती असूनही हजारो रुग्णांना संक्रमित रक्त चढवून एचआयव्ही, हेपेटायटीस सी, हिमोफिलिया यांसारख्या घातक आजारांना बळी पाडले गेले.
UK’s Contaminated Blood Scandal: ब्रिटनमध्ये (Uk) एक मोठा संक्रमित रक्त घोटाळा (Contaminated Blood Scandal) उघडकीस आला आहे. या संक्रमित रक्ताने 30 हजारांहून अधिक लोकांचा जीव धोक्यात घालून, सुमारे तीन हजार लोकांचा बळी घेतल्याचे सत्य सोमवारी समोर आले. महत्वाचे म्हणजे हा घोटाळा लपवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आल्याचेही तपास अहवालात समोर आले आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबतचे पुरावेही नष्ट केले होते. ब्रिटनमध्ये, 1970 पासून ते 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस, एचआयव्ही आणि हेपेटायटीस सी संक्रमित रक्त संक्रमणामुळे सुमारे तीन हजार लोकांचा मृत्यू झाला व 30 हजाराहून अधिक लोकांना या रोगांची लागण झाली. ही बाब 1948 पासून ब्रिटनच्या सरकार-संचलित राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) च्या इतिहासातील सर्वात प्राणघातक आपत्ती मानली जाते.
या घातक आरोग्य घोटाळ्याच्या सार्वजनिक अहवालात असे उघड झाले आहे की, अधिकारी आणि सार्वजनिक आरोग्य सेवेला याबाबत माहिती असूनही हजारो रुग्णांना संक्रमित रक्त चढवून एचआयव्ही, हेपेटायटीस सी, हिमोफिलिया यांसारख्या घातक आजारांना बळी पाडले गेले. एनएचएसने सरकारला सादर केलेल्या तपास अहवालात संक्रमित रक्त घोटाळा झाकल्याचा आरोप होता. चौकशीचे अध्यक्ष सर ब्रायन लँगस्टाफ यांनी सोमवारी हा अहवाल सादर केला आहे. ब्रायन लँगस्टाफ यांनी तत्कालीन सरकारे आणि वैद्यकीय व्यावसायिकांवर ही आपत्ती टाळण्यात अपयशी ठरल्याची टीका केली.
असे म्हटले जाते की, 1970 आणि 1980 च्या दशकात, हजारो लोकांना इंट्राव्हेनस रक्त संक्रमणाची आवश्यकता होती त्यांना हेपेटायटीसने दूषित रक्त दिले गेले. त्यात हेपेटायटीस सी आणि एचआयव्ही विषाणूंनी दूषित रक्त देखील होते. एनएचएसने 1970 च्या दशकाच्या सुरुवातीस हिमोफिलिया असलेल्या लोकांसाठी रक्ताच्या प्लाझ्मापासून घेतलेला फॅक्टर VIII हा नवीन उपचार सुरू केला. या उपचारासाठी रक्ताची मोठी मागणी होती, ज्यामुळे एनएचएसने यूएस मधून फॅक्टर VIII आयात केला. मात्र या ठिकाणी प्लाझ्मा दाता बहुतेकदा कैदी आणि अंमली पदार्थांचे सेवन करणारे लोक होते. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढला. (हेही वाचा: Free Sunscreen in Netherland: नेदरलँड सरकारकडून नागरिकांना विनामूल्य सनस्क्रीनचा पुरवठा; वेंडिंग मशीनजवळ नागरिकांची गर्दी, नेमक प्रकरण काय?)
फॅक्टर VIII तयार करण्यासाठी हजारो रक्तदात्यांकडून मिळालेला प्लाझ्मा एकत्र केला जातो. याचा अर्थ असा की, जर यामध्ये एखाद्या संक्रमित दात्याचा समावेश असेल तर संपूर्ण बॅच दूषित होऊ शकते. तपासणीचा अंदाज आहे की, 30,000 पेक्षा जास्त लोकांना रक्त संक्रमण किंवा फॅक्टर VIII च्या उपचारांमुळे संसर्ग झाला होता. ही अपघाताने घडलेली गोष्ट नव्हती. हे संक्रमण झाले कारण अधिकारी-डॉक्टर, रक्त सेवा प्रदाते आणि सरकारांनी रुग्णांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले नाही.
आता सरकारला सादर केलेल्या या अहवालावर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी माफी मागितली आहे. संसदेचे कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बोलताना सुनक म्हणाले की, ब्रिटनसाठी हा लाजिरवाणा दिवस आहे. मला मनापासून आणि स्पष्टपणे माफी मागायची आहे. सर्व पीडितांना भरपाई दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. ही रक्कम सुमारे 12.7 अब्ज यूएस डॉलर (10580 अब्ज रुपये) पर्यंत असू शकते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)