काय सांगता? काहीही न करता महिन्याला चक्क लाखोंची कमाई; जाणून घ्या जपानच्या Shoji Morimoto ची आगळीवेगळी कहाणी (Watch Video)
जसे एका क्लायंटने त्याला रेफ्रिजरेटर उचलण्यास सांगितले तेव्हा त्याने नकार दिला. त्याने अजून एका क्लायंटसोबत कंबोडियाला जाण्यास नकार दिला होता.
पैसे मिळवणे खूप अवघड आहे यात काही शंका नाही. तुम्ही कष्ट केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय पैसे कमवू शकत नाही. पण आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जी काहीही न करता दर तासाला 5 हजार रुपयांहून अधिक कमाई करत आहे. विश्वास बसत नाही पण हे खरे आहे. ही गोष्ट आहे जपानमधील (Japan) टोकियो येथे राहणाऱ्या शोजी मोरिमोटोची (Shoji Morimoto). शोजी दररोज ₹5,679 (10,000 येन) प्रति तास कमावतो. पण यासाठी तो कोणते काम करतो? असे विचारले असता उत्तर मिळेल ‘काहीच नाही’. होय, कारण शोजी जे करतो ते जवळजवळ काहीही न करण्याच्या श्रेणीत येते.
38 वर्षीय शोजीचे काम अतिशय मनोरंजक आहे. लोक त्याला फक्त आपल्या सोबत राहण्याचे पैसे देतात. म्हणजेच आपल्यासोबत कुठेतरी चलण्यासाठी किंवा फक्त आपल्यासोबत बसून राहण्यासाठी लोक शोजीला तासाच्या हिशोबाने पैसे देतात. यामध्ये शोजीला फक्त त्या लोकांसोबत जावे लागते आणि काहीही करायचे नसते. शोजीचा दावा आहे की, त्याने गेल्या चार वर्षांत अशी सुमारे 4,000 सेशन्स केली आहेत. त्याच्या एका क्लायंटने तर त्याला सुमारे 270 वेळा बोलावले होते.
पत्नी आणि मुलाच्या उदरनिर्वाहासाठी शोजी पूर्णपणे या कामावर अवलंबून आहे. त्याला दररोज असे दोन-तीन ग्राहक मिळतात. शोजीने रॉयटर्सला सांगितले की, तो मुळात स्वतःच्या वेळेला आणि साथीला भाड्याने देतो. त्याचे काम फक्त त्याच्या क्लायंटसोबत राहणे हे आहे. कोणी त्याला आपल्यासोबत गेम पार्कमध्ये घेऊन जाते, कोणी त्याला आपल्यासोबत ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी घेऊन जाते. (हेही वाचा: अजब दुनिया, बाळाचे नाव 'पकोडा'; सोशल मीडियावर युजर्सकडून हटके प्रतिक्रिया)
मात्र असे अनेक प्रस्ताव आहेत ज्यांना शोजीने नकार दिला आहे. जसे एका क्लायंटने त्याला रेफ्रिजरेटर उचलण्यास सांगितले तेव्हा त्याने नकार दिला. त्याने अजून एका क्लायंटसोबत कंबोडियाला जाण्यास नकार दिला होता. शोजी कोणतेही सेक्स वर्क करत नाही. शोजीला त्याचे बरेचसे काम सोशल मीडियाद्वारे मिळते. ट्विटरवर त्यांचे अडीच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. शोजीने सांगितले की, स्वत: ला भाड्याने देण्याआधी, त्याने एका प्रकाशन कंपनीत काम केले, जिथे त्याला ‘काहीही करत नाही’ म्हणून नेहमीच फटकारले जात असे. अशा परिस्थितीत त्याने काहीही न करता पैसे कमावण्याचा निर्णय घेतला.