अमेरिकेत H1B Visa वर नोकरी करणाऱ्या 2 लाखाहून अधिकांचे भविष्य कोरोना व्हायरसमुळे धोक्यात; जूनमध्ये संपणार US मध्ये राहण्याची कायदेशीर मुदत
कोलमडण्याच्या मार्गावर असलेली अर्थव्यवस्था
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) उद्रेकामुळे अमेरिकेतील (America) 2 लाख पेक्षा जास्त एच 1 बी व्हिसा (H1B Visa) धारकांचे भविष्य टांगणीला लागले आहे. कोलमडण्याच्या मार्गावर असलेली अर्थव्यवस्था, वाढू पाहत असलेले लॉकडाऊन यामुळे अनेक व्यवसाय बंद झाल्याने अमेरिकेतील परदेशी कामगार बेरोजगारीच्या भीतीशी झगडत आहेत. जर ते पुढचे दोन महिने नोकरीपासून दूर राहिले, तर होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटचे निकष त्यांची अमेरिकेतून हकालपट्टी करू शकतील. आधीच एक महिना बेरोजगारीत काढल्यानंतर देशातील व्हिसा नियमांमुळे जूनपासून एच 1 बी धारकांना अमेरिकेत राहणे शक्य होणार नाही.
एच -1 बी हा तात्पुरता कामाचा व्हिसा आहे. हा व्हिसा अमेरिकन नसलेल्या लोकांना विशेष कौशल्यासह दिला जातो, ज्यामुळे लोकांना अमेरिकेत काम करण्याची कायदेशीर परवानगी मिळते. मात्र जर आपण काही कारणास्तव अमेरिकेतील आपली नोकरी गमावली आणि आपण बेरोजगार झालात, तर अशा परिस्थितीत आपण अमेरिकेत एच -1 बी व्हिसावर जास्तीत जास्त 60 दिवस राहू शकता. यापेक्षा जास्त काळ राहण्यासाठी आपल्याला फार मोठी रक्कम भरावी लागते.
या व्हिसावर लाखो भारतीय अमेरिकेत काम करत आहेत. मात्र आता यापैकी बऱ्याच भारतीयांना कोरोना संकटात पगाराविना रजेवर पाठविण्यात आले आहेत. अशा लोकांना जूनपूर्वी कामावर घेतले नाही तर त्यांना देश सोडवा लागू शकतो.
ओबामा प्रशासनात तंत्रज्ञान आणि इमिग्रेशन धोरणावर काम करणारे डग रँड यांनी, कोरोना व्हायरस या साथीच्या आजाराचा धोका लक्षात घेता, एच 1 बी प्रोग्राममध्ये कोणत्याही दुरुस्तीची घोषणा न केल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प राजवटीचा निषेध केला आहे. जर नियम बदलले नाहीत तर. स्थलांतरितांना यापुढे अमेरिकेत राहू दिले जाऊ शकत नाही. तर दुसरीकडे कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांनी आपल्या सीमा बंद केल्या आहेत त्यामुळे अशा लोकांना मायदेशी परतणेही मुश्कील ठरणार आहे. याचा परिणाम म्हणजे, ‘मानवी पातळीवर आणि आर्थिक पातळीवर एका मोठ्या आपत्तीचे आगमन’, असेही ते म्हणाले. (हेही वाचा: Coronavirus मुळे अमेरिकेत मृत्यूतांडव! 24 तासात 2,200 जणांचा COVID19 विषाणूने घेतला बळी)
Apple, Amazon, फेसबुक, गूगल आणि मायक्रोसॉफ्टच्या उच्च अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या लॉबिंग बॉडी ‘टेकनेट’ने, 17 एप्रिल रोजी होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंटला पाठवलेल्या पत्रातूनही याबाबतची चिंता दिसून येत आहे. या व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे नोकरीच्या संधींचा अभाव लक्षात घेता, ट्रम्प प्रशासनाला एच 1 बी व्हिसा नियम शिथिल करण्याचे आवाहन या गटाने केले आहे. यामुळे अनेकांच्या नोकऱ्या जातील व त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल असेही या गटाने म्हटले आहे.
मात्र एच 1 बी व्हिसाची वैधता वाढविण्यात येईल का?, यावर नागरिकत्व आणि इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या प्रवक्त्याने भाष्य करण्यास नकार दिला.