Sony Layoffs: सोनी ग्रुप 900 लोकांना कामावरून काढून टाकणार, Playstation विभागामध्ये होणार टाळेबंदी, लंडन स्टुडिओही बंद होण्याची शक्यता
सोनी ग्रुपच्या यशस्वी कंपन्यांमध्ये या सर्वांचा समावेश आहे. सोनी ग्रुपच्या नोकर कपातीमध्ये अमेरिकेपासून आशियापर्यंतच्या विभागांमधील सुमारे 8% कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
जपानची तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी सोनी ग्रुप (Sony Group) येत्या काळात मोठी टाळेबंदी करणार आहे. सोनी आपल्या प्लेस्टेशन युनिटमधून 900 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवेल. ही संख्या या युनिटच्या जागतिक कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या 8 टक्के आहे. यासोबतच कंपनी लंडनमधील स्टुडिओदेखील बंद करत असल्याचे सांगितले जात आहे. ब्लूमबर्गच्या अहवालात असा दावा केला जात आहे की, या नोकर कपातीमुळे सोनी प्लेस्टेशन उपलब्ध असलेल्या ठिकाणांवर परिणाम होईल. लंडन स्टुडिओसह इतरही अनेक प्लेस्टेशन बंद केले जात आहेत.
कोरोना महामारीनंतर आलेल्या मंदीतून सावरण्यासाठी व्हिडिओ गेम उद्योग धडपडत आहे. या क्षेत्रातील सोनीचा प्रतिस्पर्धी मायक्रोसॉफ्टने देखील या महिन्यात टाळेबंदीची घोषणा केली. त्यानुसार सुमारे 1900 लोकांना काढून टाकण्याचा त्यांचा विचार आहे. सोनीच्या या नोकर कपातीचा परिणाम गेम मेकर्स इन्सोम्नियाक, नॉटी डॉग आणि गुरिल्ला यांच्यावरही होईल. सोनी ग्रुपच्या यशस्वी कंपन्यांमध्ये या सर्वांचा समावेश आहे. सोनी ग्रुपच्या नोकर कपातीमध्ये अमेरिकेपासून आशियापर्यंतच्या विभागांमधील सुमारे 8% कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सोनीने आपल्या तिमाही कमाईचे आकडे जारी केल्यानंतर हा निर्णय घेतला. (हेही वाचा: Expedia Layoffs: ट्रॅव्हल टेक कंपनी एक्सपीडिया 1,500 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार; प्रवासाची मागणी कमी झाल्याने घेतला निर्णय)
सोनी गेमिंगचे प्रमुख जिम रायन यांनी कर्मचाऱ्यांना मेल पाठवला आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले की, टाळेबंदीचा निर्णय घेणे खूप कठीण आहे, जो अनेक महिन्यांच्या बैठका आणि विविध नेतृत्वाशी झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आला आहे. या टाळेबंदीचा उद्देश कंपनीचा नफा वाढवणे आणि संसाधने व्यवस्थित करणे हा आहे. आम्ही एक पाऊल मागे घेण्यास आणि गेमिंगमध्ये चांगले अनुभव आणण्यासाठी तयार आहोत.' दरम्यान, जागतिक व्हिडिओ गेम मार्केट गेल्या वर्षी फक्त 0.6% वाढून $184 अब्ज झाले. मात्र, 2022 मधील 5 टक्क्यांहून अधिक घसरणीपेक्षा हे चांगले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, सोनीने पुढील आर्थिक वर्षापासून प्लेस्टेशन 5 युनिट विक्रीत हळूहळू घट होण्याची अपेक्षा केली आहे.