Shooting at Mayfair Mall: अमेरिकेच्या विस्कॉन्सिनमधील मेफेयर मॉलमध्ये गोळीबार, 8 जखमी; हल्लेखोर फरार

शुक्रवारी मेफेयर मॉलमध्ये (Mayfair Mall) झालेल्या दुर्घटनेत किमान 8 जण जखमी झाले आहेत. हल्लेखोरांच्या शोधात पोलिस शोध मोहीम राबवित आहेत.

Shooting at Mayfair Mall (Photo Credits: Twitter)

Shooting at Mayfair Mall: अमेरिकेच्या विस्कॉन्सिन (Wisconsin) राज्यात मॉलमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी मेफेयर मॉलमध्ये (Mayfair Mall) झालेल्या दुर्घटनेत किमान 8 जण जखमी झाले आहेत. हल्लेखोरांच्या शोधात पोलिस शोध मोहीम राबवित आहेत. गोळीबारानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर घेरला आहे. या घटनेमुळे संपूर्ण विस्कॉन्सिन राज्यात खळबळ उडाली आहे. न्यूज एजन्सी एएफपीने स्थानिक प्रशासनाच्या हवाल्याने सांगितले की, विस्कॉन्सिनच्या ववातोसा येथील मॉलमध्ये गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने घटनास्थळावरून पळून काढला. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. तसेच हल्ल्यामागील नेमके कारणदेखील समजू शकलेले नाही.

फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) आणि मिलवॉकी काउंटी शेरीफच्या कार्यालयाने केलेल्या ट्विटनुसार, अधिकारी आणि स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ववातोसा पोलिसांनी सांगितले की, मॉलमध्ये झालेल्या गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. (हेही वाचा - पाकिस्तान मध्ये आढळले 1300 वर्ष जुन्या भगवान विष्णू मंदिराचे अवशेष)

प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, गोळीबार करणारा पुरुष हा 20 ते 30 वर्षाचा आहे. या घटनेचा तपास करणारे पथक सध्या संशयिताची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रशासनाने लोकांना घटनास्थळापासून दूर रहाण्यास सांगितले आहे. याशिवाय गोळीबार झालेला मॉलदेखील पुढील सूचना येईपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, आरोपीने मॉलमध्ये सुमारे 15 फेऱ्या गोळ्या झाडल्या.