Shinzo Abe यांनी दिला जपानच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा; 17 सप्टेंबर रोजी निवडले जातील Japan चे नवे Prime Minister
शिन्झो आबे यांच्या अचानक राजीनाम्यामुळे देशात राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.
जपानचे (Japan) प्रदीर्घ काळ पदावर राहणारे पंतप्रधान शिन्झो आबे (Shinzo Abe) यांनी पोटाच्या आजारपणामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिन्झो आबे यांच्या अचानक राजीनाम्यामुळे देशात राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. पंतप्रधान म्हणून त्यांचा कार्यकाळ सप्टेंबर 2021 पर्यंत होता. आबे यांच्या राजीनाम्यानंतर जपानचे नवीन पंतप्रधान होण्याची शर्यत सुरू झाली आहे. जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव योशीहिडे सुगा (Yoshihide Suga) हेही या शर्यतीत सामील झाले आहेत. क्योडोच्या अहवालानुसार नवीन पंतप्रधानांच्या निवडीसाठी एलडीपीची (Liberal Democratic Party) बैठक 14 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. या बैठकीत 17 सप्टेंबरला एलडीपी नेते आणि देशाचे नवीन पंतप्रधान निवडले जातील.
आरोग्याच्या कारणास्तव 65 वर्षीय आबे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची ही दुसरी वेळ आहे. 2007 च्या सुरूवातीस, आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला होता. 2012 च्या निवडणुकीत आबे पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सत्तेत परतले. आता नवीन पंतप्रधान होण्यासाठी कोणत्याही नेत्याला आधी सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे (LDP) अध्यक्ष होणे आवश्यक आहे. त्यानंतर संसदेत मतदानाद्वारे नवीन पंतप्रधान निवडले पाहिजे. नवीन पंतप्रधानांची निवड होई पर्यंत आबे आणि त्यांचे मंत्रीमंडळ सरकार चालवतील. खालच्या सभागृहात पक्षाचे बहुमत असल्यामुळे एलडीपी सप्टेंबर 2021 पर्यंत सत्तेत राहील. (हेही वाचा: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर Wuhan मधील शाळा मंगळवार पासून सुरु; प्रशासनाकडून मार्गदर्शक सुचना जारी)
सध्या शिगेरु इशिबा, फुमियो किशिदा व योशीहिदे सुगा ही तीन नावे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत- दरम्यान, आबे बर्याच दिवसांपासून आतड्यांसंबंधी रोग 'अल्सरेटिव्ह कोलायटिस' ग्रस्त आहेत. या आठवड्यात त्यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा मोठ्या आतड्याचा एक गंभीर रोग आहे, ज्याच्याशी आबे गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहे. प्रदीर्घ काळ जपानचे पंतप्रधान असण्याचा विक्रमही आबे यांच्या नावावर आहे. सोमवारी त्यांनी हा विक्रम नोंदवला.