Russia-Ukraine Crisis: रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष थांबण्याची शक्यता; वाटाघाटी करण्यासाठी मिन्स्कला शिष्टमंडळ पाठवण्यास Vladimir Putin तयार

युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनीदेखील सांगितले की, युरोपियन युनियनने युक्रेनमधील लष्करी कारवाईचा निषेध म्हणून रशियावर अतिरिक्त निर्बंध लादण्याचा राजकीय निर्णय घेतला आहे

Russian President Vladimir Putin | (Photo credit: kremlin.ru)

युक्रेनची (Ukraine) राजधानी कीवमध्ये रशियन (Russia) सैन्य आणि युक्रेनियन सैन्य यांच्यात संघर्ष सुरू आहे. अशात युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवाईवरून वाढलेल्या तणावादरम्यान युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्यासमोर वाटाघाटी करण्याचा प्रस्ताव ठेवला. ते म्हणाले की, ‘मी पुन्हा एकदा रशियाच्या अध्यक्षांना सांगू इच्छितो की, लोकांचे मृत्यू थांबवण्यासाठी आपण एकत्र येऊन वाटाघाटी करणे गरजेचे आहे.’ एका व्हिडीओद्वारे झेलेन्स्की यांनी हा संदेश दिला. स्पुतनिक न्यूज एजन्सीने याबाबत वृत्त दिले आहे.

आता माहिती मिळत आहे की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन कीवशी चर्चा करण्यासाठी मिन्स्क येथे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास तयार आहेत. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. रशिया युक्रेनशी उच्च पातळीवर वाटाघाटी करण्यास तयार आहे, असे पुतिन म्हणाले आहेत.

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, ते इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांच्याशी चर्चा करणार आहेत. आज सकाळी 10.30 वाजता चेर्निहाइव्ह, होस्टमेल आणि मेलिटोपोलच्या प्रवेशद्वारांवर जोरदार लढाई झाली. यावेळी अनेक लोक मरण पावले. आपल्या लोकांसाठी युक्रेनने लढा सुरू ठेवला आहे. स्वीडनने युक्रेनला लष्करी, तांत्रिक आणि मानवतावादी मदत दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच झेलेन्स्की यांनी, अशा तणावाच्या दरम्यान युक्रेनला लवकरात लवकर मदत न पुरवल्याबद्दल काही युरोपियन देशांवर टीका केली.

त्यांनी आपल्या अजून एका ट्वीटमध्ये सांगितले की, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी आदल्या दिवशी सांगितले होते की, मॉस्को कीवसोबत कोणत्याही क्षणी वाटाघाटीसाठी तयार आहे. लावरोव्ह म्हणाले होते की, ‘आम्ही वाटाघाटीसाठी तयार आहोत. युक्रेनच्या सशस्त्र दलांनी आमच्या राष्ट्राध्यक्षांच्या (व्लादिमीर पुतिन) आवाहनाला प्रतिसाद देत प्रतिकार करणे थांबवावे आणि शस्त्रे खाली ठेवावीत. त्यांच्यावर कोणीही हल्ला करणार नाही.’

झेलेन्स्की यांनी युरोपियन देशांना ‘युद्ध’ थांबवण्याची मागणी करण्याचे आवाहन केले. यूके, अमेरिका, कॅनडा आणि युरोपियन युनियनसह अनेक देशांच्या नेत्यांनी युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवायांचा निषेध केला आहे. त्यांनी रशियावर कठोर निर्बंधही लादले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी गुरुवारी सांगितले की, ते मॉस्कोला जागतिक अर्थव्यवस्थेपासून वेगळे करण्याच्या व्यापक प्रयत्नात असून त्यसाठी रशियावर निर्बंध घातले जातील. (हेही वाचा: Russia-Ukraine War: युक्रेनकडून जोरदार प्रत्युत्तर; रशियाचे 800 सैनिक मारले, 18-60 वयोगटातील पुरुषांना देशाबाहेर जाण्यास बंदी)

युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनीदेखील सांगितले की, युरोपियन युनियनने युक्रेनमधील लष्करी कारवाईचा निषेध म्हणून रशियावर अतिरिक्त निर्बंध लादण्याचा राजकीय निर्णय घेतला आहे. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन यांनी सांगितले की, रशियाविरूद्ध युरोपियन युनियनच्या नवीन निर्बंधांचा फटका 70 टक्के रशियन बँकिंग क्षेत्राला, प्रमुख सरकारी कंपन्यांना बसेल.