इंग्लंडच्या राजघराण्यात Coronavirus चा शिरकाव; प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना व्हायरसची लागण; स्कॉटलंड येथे सेल्फ आयसोलेशनमध्ये राहणार
याच्या तावडीतून आता मोठ मोठे दिग्गजही सुटू शकले नाहीत असे दिसत आहे
कोरोना व्हायरसने (Coronavirus) जगातील अनेक देशांवरील आपली पकड घट्ट करायला सुरुवात केली आहे. याच्या तावडीतून आता मोठ मोठे दिग्गजही सुटू शकले नाहीत असे दिसत आहे. आता इंग्लंडच्या राजघराण्यामध्ये या विषाणूने शिरकाव केला आहे. नुकतेच प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. 71 वर्षीय प्रिन्स चार्ल्स हे इंग्लंडच्या राजगादीचे पुढील वारसदार आहेत. प्रिन्स ऑफ वेल्सच्या ऑफिसकडून मिळालेल्या माहितीनुसार, चार्ल्स यांची पत्नी कॅमिला (The Duchess of Cornwall) यांचीही कोरोना व्हायरसची चाचणी घेण्यात आली, ती मात्र निगेटिव्ह आली आहे. सध्या हे दोघेही स्कॉटलंड येथे सेल्फ आयसोलेशन मध्ये आहेत.
प्रिन्स ऑफ वेल्सचे ऑफिस, क्लेरेन्स हाऊसकडून याबाबत एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. ज्यामध्ये असे लिहिले आहे- ‘सध्या प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना व्हायरसची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. ही काही लक्षणे सोडता त्यांची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे. गेल्या काही दिवसांपासून ते घरीच बसून काम करत होते’. Aberdeenshire इथल्या NHS मध्ये प्रिन्स चार्ल्स यांची कोरोना चाचणी पार पडली, जिथे या चाचणीसाठी लागणारे सर्व निकष त्यांनी पूर्ण केले.
क्लेरेन्स हाऊसने पुढे दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही आठवड्यांमध्ये प्रिन्स चार्ल्स यांनी अनेक सार्वजनिक उपक्रमांमध्ये भाग घेतला होता. या दरम्यान त्यांच्या अनेक लोकांशी भेटीगाठी झाल्या होत्या, त्यामुळे नक्की कोणापासून त्यांना या विषाणूची लागण झाली ते सांगणे कठीण आहे. दरम्यान, याआधी कोरोनाच्या भीतीमुळे ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीयने, तिचे अधिकृत निवासस्थान बकिंगहॅम पॅलेस सोडून विंडसर कॅसलकडे प्रस्थान केले होते. देशात कोरोना विषाणूमुळे झालेल्या अनेक मृत्युनंतर 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना सुरक्षित राहण्याचा सल्ला देण्यात आला होता, या पार्श्वभूमीवर राणी एलिझाबेथ व तिचे 98 वर्षीय पती, प्रिन्स फिलिप हे पुढचे काही दिवस विंडसर कॅसल येथे राहणार आहेत. (हेही वाचा: कोरोना व्हायरसमुळे येणारी आर्थिक मंदी ही 2009 पेक्षा भयानक असू शकते; IMF चीफ यांचा धोक्याचा इशारा)
आता बकिंघम पॅलेसने दिलेल्या निवेदनानुसार, सध्या राणीची प्रकृती उत्तम आहे. 12 मार्च रोजी सकाळी प्रिन्स ऑफ वेल्स आणि राणी एलिझाबेथ यांची भेट झाली होती. राणीच्या उत्तम आरोग्यासाठी सर्व उपयोजना राबवल्या जात आहेत.'