काय सांगता? लोकप्रिय गायिकेने जाणूनबुजून स्वतःला करवून घेतली Covid-19 ची लागण; समोर आले धक्कादायक कारण
तिने संगीत उद्योगात यशस्वी करिअर केले आहे. मात्र, तिने स्वत:ला कोरोना विषाणूची लागण करून घेतल्याने तिचे चाहतेही तिच्यावर नाराज आहेत.
चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे देशात इतकी वाईट परिस्थिती आहे की, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या आकडेवारीने पुन्हा जगाची चिंता वाढवली आहे. या सगळ्या दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. चिनी गायिका जेन झांग (Jane Zhang) हिने जाणूनबुजून स्वतःला कोरोना व्हायरसची लागण केल्याचे सांगितले जात आहे.
ही बातमी समोर आल्यानंतर सर्वजण चिनी गायीकेवर शाब्दिक वार करत आहेत. सर्वांनाच हे जाणून घ्यायचे आहे की, सध्याच्या परिस्थितीमध्ये एक व्यक्ती स्वतः आपल्या पायावर कुऱ्हाड का मारून घेईल. चिनी गायिका जेन झांगने स्वत: सोशल मीडियावर कोरोना व्हायरसची लागण होण्याच्या आपल्या योजनेबद्दल खुलासा केला. तिने सांगितले की, ती अशा घरात मुद्दाम गेली जिथे कोविडची लागण झालेले लोक होते. यानंतर तिला डोकेदुखी, ताप आणि घसादुखी अशी कोरोनाची सामान्य लक्षणे जाणवू लागली. परंतु त्यानंतर ती यातून बरीही झाली.
लोकांना याची माहिती मिळताच त्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. त्यानंतर मात्र गायिकेने आपली पोस्ट हटवून लोकांची माफी मागितली. जेन झांगने यामागचे सांगितलेले कारण धक्कादायक आहे. ती म्हणाली की, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येसाठी ती एक संगीत कार्यक्रम करत आहे व सध्या त्याची तयारी सुरु आहे. या कार्यक्रमावेळी तिला कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका टळावा म्हणून तिने आधीच स्वतःला कोरोना विषाणूची लागण करून घेतली, जेणेकरून ती डिसेंबरच्या अखेरीस संगीत कार्यक्रमावेळी कोविड पॉझिटिव्ह होऊ नये. (हेही वाचा: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार; स्मशानभूमीत लांबच लांब रांगा, शाळांना ऑनलाइन वर्ग घेण्याचे आदेश)
दरम्यान, जेन हा चीनमधील एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिने संगीत उद्योगात यशस्वी करिअर केले आहे. मात्र, तिने स्वत:ला कोरोना विषाणूची लागण करून घेतल्याने तिचे चाहतेही तिच्यावर नाराज आहेत. चीनमधील परिस्थिती पाहून भारतही सतर्क झाला असून याबाबत आढावा बैठकही घेण्यात आली. केंद्र सरकारने लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. पण या सगळ्यात चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या Omicron sub variant BF.7 ने देशात प्रवेश केला आहे. आतापर्यंत गुजरातमध्ये दोन आणि ओडिशात एक प्रकरण समोर आले आहे.