Plane Crash in Brazil: ब्राझीलमध्ये विमान कोसळले, 14 ठार; Amazon राज्यातील घटना
गव्हर्नरांनी म्हटले आहे की, विमान अपघातातील मृतांमध्ये दोन क्रू सदस्य आणि 12 प्रवाशांचा समावेश आहे.
Plane Crash in Amazon State: ब्राझीलमधील एमेझॉन राज्यात मध्यम आकाराचे विमान कोसळून (Plane Crash in Brazil) झालेल्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे गव्हर्नर विल्सन लिमा दिलेल्या माहिती नुसार ही घटना राज्याची राजधानी मानौसपासून साधारण 248 मैल म्हणजेच 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या बार्सेलोस प्रांतात ही घटना घडली. गव्हर्नरांनी म्हटले आहे की, विमान अपघातातील मृतांमध्ये दोन क्रू सदस्य आणि 12 प्रवाशांचा समावेश आहे.
विमान अपघातात मृत्यू झालेल्या क्रूमेंबर्स आणि प्रवाशांच्या निधनाबद्दल आम्हाला तीव्र दु:ख आहे. आम्ही सर्वजण मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत. आपत्कालीन विभागाचे आमचे एक पथक घटनास्थळी पोहोचले असून, मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. पीडितांच्या सर्व संबंधितांशी माझ्या संवेदना आहेत, अशा भावना गव्हर्नर विल्सन लिमा यांनी 'X' द्वारे व्यक्त केल्या आहेत.
मानौस एरोटॅक्सी एअरलाईन्सने या घटनेबाबत माहिती देण्यासाठी दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, घडलेली घटना हा एक अपघात आहे. आम्ही या अपघाताची कारणे शोधन्याचा प्रयत्न सुरु केला असून, चौकशी सुरु आहे. दरम्यान, या निवेदनात मृतांच्या आणि जखमींच्या एकूण संख्येबाबत कोणतीही ठोस माहिती अथवा निश्चित आकडेवारी देण्यात आली नाही. घटनेदरम्यानचा नाजूक काळ आणि गोपनियथा धोरण विचारात घेता आम्ही अधिक माहिती देऊ शकत नाही. मात्र, आम्ही लवकरच चौकशी पूर्ण करु. त्यानंतर घटना आणि तपासाबद्दल अद्ययावत माहिती दिली जाईल, असेही या निवेदनात म्हटले आहे.
ट्विट
दरम्यान, ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मृतांमध्ये यूएसच्या नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान, रॉयटर्स या वृत्तसंस्थेने मात्र या वृत्ताची आम्ही अधिकृत पुष्टी करु शकलो नसल्याचे म्हटले आहे.