Philippines: 'कोरोना विरोधी लस घ्यायची नसेल तर भारतामध्ये जा'; अध्यक्ष Rodrigo Duterte यांचे वादग्रस्त विधान
दक्षिण पूर्व आशियामध्ये फिलिपाईन्स (Philippines) देश हा कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित देशांपैकी एक आहे
जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूची (Coronavirus) दुसरी लाट येऊन गेली आहे व आता नव्या डेल्टा व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेची चिंता सतावू लागली आहेत. दक्षिण पूर्व आशियामध्ये फिलिपाईन्स (Philippines) देश हा कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित देशांपैकी एक आहे. देशात कोरोनाविरोधी लसीकरण सुरु केले मात्र त्यास जनतेचा अपेक्षित प्रतिसाद दिसून येत नसल्याचे आढळले आहे. अशात फिलिपिन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्टे (Rodrigo Duterte) यांनी जे लोक लस घेत नाहीत त्यांना भारतामध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे. जनतेला संबधित करताना दुतेर्टे यांची जीभ घसरली.
फिलिपाईन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्टे यांनी कोरोना विषाणूसंबंधी नियम व निर्बंधांमध्ये शिथिलता न आणता, देशातील लोकांसमोर दोन अटी ठेवल्या आहेत. रॉड्रिगो यांनी आपल्या पूर्व रेकॉर्ड केलेल्या सार्वजनिक भाषणादरम्यान सांगितले की, 'जे लोक लस घेण्यास तयार नसतील त्यांना तुरुंगात डांबले जाईल आणि ज्यांना लस घ्यायची नाही अशा लोकांना हवे असल्यास त्यांनी भारत किंवा अमेरिकेत जावे.’ कदाचित भारत आणि अमेरिकेमुळे कोरोना संसर्गामध्ये वाढ झाली असा ग्रह असल्याने रॉड्रिगो यांनी हे वक्तव्य केले असावे.
आपल्या भाषणात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, 'मला चुकीचे समझू नका. हा देश संकटाचा सामना करीत आहे, ही राष्ट्रीय आपत्कालीन परिस्थिती आहे. जर तुम्हाला लसीकरण करून घ्यायचे नसेल तर तुम्हाला अटक केली जाईल. आपण आधीपासूनच पिडीत आहोत आहे आणि तुम्ही लस घेत नसल्याने देशाचा त्रास आणखीन वाढवत आहात.' ते पुढे म्हणाले, 'म्हणून तुम्ही सर्व फिलिपिनो ऐका आणि काळजी घ्या, मला सक्ती करण्यास भाग पाडू नका. जर एखाद्याला ते आवडत नसेल तर ती व्यक्ती भारत किंवा अमेरिकेत जाऊ शकते. परंतु जोपर्यंत तुम्ही येथे आहात आणि विषाणूच्या प्रसार करण्यास सक्षम अशी व्यक्ती असला तर तुम्हाला लस घ्यावी लागेल.' (हेही वाचा: Covid-19 लस घ्या नाहीतर तुरुंगात रवानगी होईल; 'या' देशाच्या अध्यक्षांनी काढला नवा फतवा)
रॉड्रिगो यांनी नंतर कोरोना विरोधी लस न घेणाऱ्या लोकांना, मुख्यतः डुकरांचा उपचार करण्यासाठी वापरली जाणारी लस, इव्हर्मेक्टिनचा डोस देण्याची धमकी दिली. 11 कोटी लोकसंख्या असलेल्या फिलिपिन्समध्ये अपेक्षेप्रमाणे लसीकरणाची गती नाही. सोमवारपर्यंत, केवळ 1.95% लोकांनीच कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत, जे फारच कमी आहे.