Pakistan: पत्रकारिता करण्यासाठी पाकिस्तान सर्वात धोकादायक देश; 1990 पासून 138 Journalists ची हत्या- Report 

या वर्षाच्या सुरूवातीला फ्रीडम नेटवर्कच्या अहवालात असे म्हटले आहे की, 2000 पासून पाकिस्तानला पत्रकारिता करण्यासाठी जगातील सर्वात धोकादायक देशांपैकी एक म्हणून स्थान देण्यात आले आहे

Pakistan Flag (File Image)

Dangerous Country for Practising Journalism: आतंकवादाला पाठींबा देण्याबद्दल नेहमीच पाकिस्तानवर (Pakistan) ताशेरे ओढले गेले आहेत. हिंसाचाराच्या बाबतीतही आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानचे तितकेसे चांगले नाव नाही. आता आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघाने (The International Federation of Journalists), व्हाइट पेपर ऑन ग्लोबल जर्नलिझममध्ये पत्रकारितेसाठी (Journalism) असुरक्षित असलेल्या 5 देशांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत पाकिस्तानचे नावदेखील समाविष्ट आहे. या अहवालात म्हटले आहे की 1990 ते 2020 या काळात पाकिस्तानमध्ये तब्बल 138 पत्रकारांच्या हत्या झाल्या आहेत. डॉनच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानमध्ये 1990 ते 2020 या काळात ड्युटीवर असताना 2,658 पत्रकारांनी आपला जीव गमावला आहे.

इराक या यादीत अव्वल आहे. येथे 340 पत्रकार मारले गेले आहेत. त्याचबरोबर मेक्सिकोमध्ये 178 आणि फिलिपिन्समध्येही 178 पत्रकारांच्या हत्येची प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. यानंतर या यादीमध्ये पाकिस्तानचा क्रमांक आहे. पाकिस्तानमध्ये 1900 ते 2020 या वर्षात 138 पत्रकारांची हत्या झाली आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघाने 15 देशांतील 24 पत्रकारांच्या हत्येची प्रकरणे नोंदविली आहेत. यावर्षी ठार झालेल्या पत्रकारांच्या यादीत सलग चौथ्यांदा मेक्सिको अव्वल स्थानावर आहे. येथे पाच वर्षांत 13 पत्रकारांच्या हत्येची प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.

यावर्षी पाकिस्तानमध्ये 5, अफगाणिस्तान, इराक आणि नायजेरियात प्रत्येकी 3 पत्रकारांच्या हत्या झाल्या आहेत. त्याच वेळी, फिलिपिन्स, सोमालिया आणि सीरियामध्ये 2-2 पत्रकारांची हत्या झाल्याची नोंद आहे. कॅमेरून, होंडुरास, पराग्वे, रशिया, स्वीडन आणि येमेनमध्ये प्रत्येकी 1 पत्रकाराच्या हत्येची नोंद झाली आहे. अहवालात असे पुढे म्हटले आहे की, भारतीय उपखंडात 1990 पासून पाकिस्तानमध्ये दरवर्षी पत्रकारांच्या हत्येची प्रकरणे समोर आली आहेत. अशाप्रकारे आशिया पॅसिफिक प्रदेशातील पत्रकारांच्या मृत्यूंपैकी 40 टक्के मृत्यूची नोंद एकट्या पाकिस्तानमध्ये झाली आहे. (हेही वाचा: गरिबीमुळे आलेल्या नैराश्येमधून पित्याने उचलले टोकाचे पाऊल; 5 अल्पवयीन मुलांना फेकून दिले कालव्यामध्ये)

या वर्षाच्या सुरूवातीला फ्रीडम नेटवर्कच्या अहवालात असे म्हटले आहे की, 2000 पासून पाकिस्तानला पत्रकारिता करण्यासाठी जगातील सर्वात धोकादायक देशांपैकी एक म्हणून स्थान देण्यात आले आहे. याठिकाणी 2000 पासून 140 हून अधिक पत्रकार मारले गेले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.