Pakistan Flood: पुरामुळे पाकिस्तानातील मृतांचा आकडा 1,400 च्या पुढे; आधीच कंगाल झालेल्या अर्थव्यवस्थेचे 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान
सर्वाधिक प्रभावित दक्षिण सिंध प्रांतातील काही भागांमध्ये आणखी पावसाच्या अंदाजामुळे पुन्हा पुराची भीती निर्माण झाली आहे. सिंधमधील पूरग्रस्त भागातून लोकांना बाहेर काढण्यासाठी अधिकारी झटत आहेत.
पाकिस्तानात नुकत्याच आलेल्या पुरामुळे (Pakistan Flood) प्रचंड नुकसान झाले आहे. देशात शेतजमीन, घरे, रस्ते नष्ट झाले आहेत. गुरांचे मृत्यू झाले आहेत. ग्रामीण तसेच शहरी भागही प्रभावित झाले आहेत. परिणामी अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पाकिस्तानच्या मंत्र्याने म्हटले आहे की, पाऊस आणि पुरामुळे देशाचे 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यात, संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी पाकिस्तानच्या भेटीदरम्यान, पुरामुळे सुमारे 30 अब्ज डॉलर्सचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता.
सोमवारी पाकिस्तानमध्ये नॅशनल फ्लड रिस्पॉन्स कोऑपरेशन सेंटर (NFRCC) ची बैठक झाली. यामध्ये अर्थ मंत्रालयाने पुरामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीचा अहवाल सादर केला. अर्थ मंत्रालयाचे म्हणणे आहे की सुरुवातीच्या तपासातच देशात 18 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. NFRCC चे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे नियोजन मंत्री अहसान इक्बाल म्हणाले, मुसळधार पाऊस आणि पुरामुळे $40 अब्जांपेक्षा जास्त नुकसान झाले असावे.
पुरामुळे झालेल्या विनाशाचा आढावा घेण्यासाठी जागतिक बँक, आशियाई विकास बँक आणि प्रांतीय-संघीय सरकारची मदत घेतली जाईल. प्राथमिक मूल्यांकन अहवाल तयार करण्यात गुंतलेल्या अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जर तूट 40 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली तर याचा अर्थ पाकिस्तानची आर्थिक वाढ यावर्षी नकारात्मक होऊ शकते. तसेच पुरवठा साखळीतील अडचणींमुळे महागाई 30 टक्क्यांच्या पुढे जाऊ शकते. पाकिस्तानमधील पुरामुळे 33 दशलक्षाहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत, ज्यांना त्वरित मदतीची गरज आहे. (हेही वाचा: ब्रिटेनला मागे टाकत भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था)
पाकिस्तानमधील पुरामुळे मृतांची संख्या 1,400 च्या वर गेली आहे. सर्वाधिक प्रभावित दक्षिण सिंध प्रांतातील काही भागांमध्ये आणखी पावसाच्या अंदाजामुळे पुन्हा पुराची भीती निर्माण झाली आहे. सिंधमधील पूरग्रस्त भागातून लोकांना बाहेर काढण्यासाठी अधिकारी झटत आहेत. हवामान खात्याने पुढील 24 ते 72 तासांत प्रांतातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळ पावसाचा अंदाज वर्तवला आहे. प्रांतात 274 मुलांसह किमान 638 लोकांचा मृत्यू झाला आहे.