Pakistan: पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना धक्का, MQMP ने पाठिंबा काढला, पीटीआय सरकारने बहुमत गमावले

त्यांच्या तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाला जोरदार झटका बसला आहे. अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वीच पीटीआयचा मित्रपक्ष कौमी मूव्हमेंट पाकिस्तान (MQMP) ने सरकारचा पाठींबा काढला आहे.

Imran Khan | (Photo Credit: Facebook)

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांचा सत्तेवरुन पायउतार जवळपास निश्चित झाला आहे. त्यांच्या तहरीक-ए-इंसाफ (PTI) पक्षाला जोरदार झटका बसला आहे. अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वीच पीटीआयचा मित्रपक्ष कौमी मूव्हमेंट पाकिस्तान (MQMP) ने सरकारचा पाठींबा काढला आहे. एमक्यूएमने विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तान पीपुल्स पार्टी (PPP) सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. एमक्यूएमने पाठिंबा काढल्यानंतर इमरान खान यांचे सरकार गडगडणार (Pakistan PM Imran Khan Loses Majority) हे निश्चित झाले आहे.

एमक्यूएमने पीटीआयचा पाठिंबा काढल्यानंतर पीपीपी अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी एक ट्विट केले आहे. भुट्टो यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, 'संयुक्त विरोधी पक्ष आणि एमक्यूएम यांच्यात एक समझोता झाला आहे. राबता समिती एमक्यूएम आणि पीपीई सीईसी समझोत्याची पुष्टी करेन. त्यानंतर आम्ही उद्या एक पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांना माहिती देऊ'. दरम्यान, या ट्विटमध्ये पाकिस्तानला भुट्टो यांनी शुभेच्छाही दिल्या आहेत. (हेही वाचा, Pakistan: पंतप्रधान इम्रान खान रविवारी राजीनामा देण्याची शक्यता)

एमक्यूएमने पाठिंबा काढल्यावर पीटीआय सरकारने कनिष्ठ सभागृहातील बहुमत गमावले आहे. सभागृहात पीटीआय समर्थक सदस्यांची संख्या घटली असून ती 164 वर पोहोचली आहे. तर संयुक्त विरोधकांची संख्या 177 इतकी झाली आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीत एकूण सदस्यांची संख्या 342 आहे. बहुमतासाठी 172 सदस्यांची आवश्यकता असते. त्यामुळे विरोधकांनी सादर केलेल्या अविश्वास ठरावावर 31 मार्च रोजी चर्चा होणार होती आणि तीन एप्रिलला मतदान होणार होते. मात्र, तोवरच चित्र स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, इमरान खान यांनी आरोप केला आहे की, काही लोक विदेशी पैशांच्या मदतीने त्यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. इमरान खान यांनी एका रॅलीमध्ये म्हटले की, पाकिस्तानमध्ये सरकार बदलण्यासाठी विदेशी पैसा पुरवला जात आहे. त्यासाठी आमच्या लोकांचा वापर केला जात आहे. काही लोक याच विदेशी पैशाचा वापर करु लागले आहेत. आम्हाला माहिती आहे की, कोणकोणत्या ठिकाणी दबाव टाकला जातो आहे. काही झाले तरी आम्ही राष्ट्रहिताशी कधीच समझोता करणार नाही.