North Korea Food Crisis: उत्तर कोरियामध्ये मोठे अन्नधान्य संकट; एक किलो केळी 3,336 रुपये, तर 'ब्लॅक टी'ची किंमत 5,167 रुपये

उत्तर कोरियामध्ये मोठे अन्न संकट (Food Crisis) उभा राहिले असून, आता फक्त दोन महिने पुरेल इतकाच अन्नसाठा आहे.

File image of Kim Jong-un | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरिया (North Korea) उपासमारीच्या (Starvation) दिशेने वाटचाल करत आहे. उत्तर कोरियामध्ये मोठे अन्न संकट (Food Crisis) उभा राहिले असून, आता फक्त दोन महिने पुरेल इतकाच अन्नसाठा आहे. हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong-Un) यांनी परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचा इशारा दिला आहे. किम जोंग उनने प्रथमच औपचारिकपणे कबूल केले की त्यांच्या देशात अन्नधान्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागला आहे. आपल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत ते म्हणाले, लोकांच्या अन्नाची परिस्थिती आता चिंतेची बनली आहे. किम म्हणाले की, गेल्या वर्षीच्या वादळामुळे पूर आल्यामुळे देश कृषी क्षेत्र धान्य उत्पादनाचे लक्ष्य गाठू शकला नाही.

उत्तर कोरियामध्ये खाद्यपदार्थांची कमतरता इतकी वाढली आहे की, देशात एक चहा 5100 रुपयांना विकला जात आहे. त्याचबरोबर कॉफीची किंमत 7300 रुपयांपर्यंत पोहोचली आहे व एक किलो केळी 3,336 रुपयांना विकली जात आहेत. उत्तर कोरियाने कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी चीनबरोबरच्या आपल्या सीमा बंद केल्या आहेत, त्यामुळे इथे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा बंद झाला आहे. अशात या वर्षी आलेल्या बर्‍याच समुद्री वादळांनी देतील पिके उध्वस्त केली. यामुळे उत्तर कोरियाचे कृषी उत्पादन रखडले.

या संकटाच्या परिस्थितीत लोकांमध्ये अशी भीती आहे की, ही परिस्थिती 1990 च्या काळातील उपासमारीसारखी बनेल. त्यावेळी उपासमारीमुळे उत्तर कोरियामधील तीस लाख लोक मरण पावले होते. उत्तर कोरियामध्ये सध्या साखर, तेल आणि मैद्याची कमतरता आहे. याशिवाय तांदूळ व इंधन पुरवठाही रखडला आहे. दक्षिण कोरियाची एक सरकारी थिंक-टँक कोरियन डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटने गेल्या महिन्यात उत्तर कोरियाला यावर्षी सुमारे दहा लाख टन अन्नाचा तुटवडा जाणवू शकतो असे सांगितले होते. (हेही वाचा: हुकूमशहा Kim Jong-Un घाबरला Covid-19 ला; दिले कबुतर व मांजरी मारण्याचे आदेश, जाणून घ्या काय आहे संबंध)

उत्तर कोरियामध्ये कृषी उत्पादन घटले आहे, परंतु किमने बैठकीत सांगितले की मागील वर्षाच्या तुलनेत देशातील औद्योगिक उत्पादन वाढले आहे. किमने यावर्षी एप्रिलमध्येही कबूल केले की त्यांचा देश एक मोठ्या संकटामधून जात आहे. या संकटामध्ये आशा आहे की किम आपल्या देशाच्या सीमा खुल्या करू शकेल.