No Mask In UK: इंग्लंडमध्ये आता मास्क घालणे बंधनकारक नाही, देशात Covid-19 निर्बंधांमध्ये शिथिलता; पंतप्रधान Boris Johnson यांची मोठी घोषणा

ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद म्हणतात की, ते आशावादी आहेत की पुढील आठवड्यापर्यंत हे नियम मोठ्या प्रमाणात हटवले जातील

Boris Johnson | (Photo Credits: Facebook)

इंग्लंडचे (England) पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी मोठी घोषणा केली आहे. जग अजूनही कोरोनाशी (Covid-19) लढत असताना, पुढील आठवड्यापासून ओमायक्रॉन प्रकाराचा सामना करण्यासाठी इंग्लंडमध्ये लागू केलेल्या कोविड उपायांच्या समाप्तीची घोषणा आज पंतप्रधानांनी केली. यामध्ये सार्वजनिक वाहतूक आणि दुकानांमध्ये अनिवार्य मास्क घालणे, घरून काम करणे आणि नाइटक्लबसारख्या सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करण्यासाठी लस प्रमाणपत्र दाखवणे यांचा समावेश आहे. यूके सरकारने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये, कोरोनाव्हायरस तसेच ओमायक्रॉन प्रसाराच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत मास्क घालणे बंधनकारक केले होते.

देशात जास्तीत जास्त लोकांना कोरोना विरोधी लसीचा तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस दिल्यानंतर युके सरकारने हा निर्णय घेतला आहे. जॉन्सन म्हणाले की, प्लॅन बी निर्बंध 26 जानेवारी रोजी उठवले जातील. येत्या काही आठवड्यांमध्ये कोरोना व्हायरस असलेल्या लोकांसाठी सेल्फ-आयसोलेशन नियम संपवण्याबाबतही त्यांनी भाष्य केले. 24 मार्च रोजी या नियमांची मुदत संपणार आहे, तेव्हा त्याची कायदेशीर आवश्यकताही संपेल. परंतु ही तारीख आणखी पुढे जाऊ शकते.

डिसेंबरमध्ये ओमायक्रॉनने संपूर्ण यूकेमध्ये प्रवेश केल्यामुळे नवीन निर्बंध लागू केले होते. मात्र हे निर्बंध इतक्या लवकर उठवले जाऊ नयेत असे सार्वजनिक आरोग्य सेवेशी निगडीत काही संचालकांचे मत आहे. इंग्लंडच्या उत्तरेमध्ये ओमायक्रॉनची लाट लंडनपेक्षा थोडी उशिरा आली होती, त्यामुळे अजूनही तिथे विषाणूची भीती आहे. परंतु पंतप्रधानांनी सांगितले की, विषाणूची रोजची प्रकरणे कमी होत आहेत आणि ओमायक्रॉनची लाटही ओसरत आहे, त्यामुळे नियमांमध्ये शिथिलता आणली जाऊ शकते. (हेही वाचा: Zimbabwe: लॉकडाऊनमध्ये मुलींचे 'गरोदर' होण्याचे प्रमाण वाढले; सरकारच्या वाढत्या चिंता, आता पुन्हा सुरु केल्या शाळा)

निर्बंध जरी हटवले जात असले तरी, चीन, हाँगकाँग आणि इतर युरोपीय देशांमधून येणाऱ्या लोकांसाठी यूकेमध्ये प्रवेशावरील निर्बंध कायम राहतील. ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद म्हणतात की, ते आशावादी आहेत की पुढील आठवड्यापर्यंत हे नियम मोठ्या प्रमाणात हटवले जातील. जाविद म्हणाले की, ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यापासून, यूकेच्या 15 दशलक्ष प्रकरणांपैकी एक तृतीयांश प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जॉन्सन यांना एकूणच ज्या पद्धतीने त्यांनी महामारी हाताळली त्याबद्दल मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले आहे. ब्रिटनमध्ये या महामारीमुळे 152,513 मृत्यू झाले होते, ही संख्या जागतिक स्तरावर सातव्या क्रमांकावर होती.