Nirav Modi Extradition: ब्रिटिश कोर्टाने दिले फरार निरव मोदीच्या प्रत्यार्पणाचे आदेश; लवकरच आणले जाणार भारतात, आर्थर रोड कारागृह बॅरेक 12 असू शकते नवी जागा

त्याला अन्न, शुद्ध पाणी, स्वच्छ शौचालय, पलंगाची सुविधा देण्यात यावी. मुंबई सेंट्रल जेलचे डॉक्टरही नीरवसाठी उपलब्ध असावेत

निरव मोदी (Photo Credits: Facebook/Nirav-Modi)

पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये (Punjab National Bank) मामा मेहुल चोकसी याच्यासह 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणार्‍या हिरा व्यापारी नीरव मोदी (Nirav Modi) ला ब्रिटिश कोर्टामध्ये मोठा झटका बसला आहे. कोर्टाने भारताची विनंती मान्य केली असून नीरवच्या प्रत्यार्पणाचे (Extradition) आदेश दिले आहेत. कोर्टाने असेही म्हटले आहे की, नीरव मोदीविरूद्ध पुरेसे पुरावे आहेत आणि त्याला दोषीही सिद्ध केले जाऊ शकते. 49 वर्षीय नीरव मोदी हा दक्षिण-पश्चिम लंडनच्या वॅन्ड्सवर्थ कारागृहातून व्हिडिओ लिंकद्वारे वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयात हजर झाला. जिल्हा न्यायाधीश सॅम्युएल गूजी यांनी निकाल देताना नीरव मोदीने मानसिक आरोग्याबाबत उपस्थित केलेले प्रश्न फेटाळून लावले.

कोर्टाने म्हटले आहे की, नीरवचे भारतात प्रत्यार्पण केले गेले तर त्याच्यावर अन्याय होणार नाही. कोर्टाने म्हटले आहे की, मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातील बॅरेक 12 नीरव मोदीसाठी योग्य आहे. न्यायाधीश म्हणाले की, नीरव मोदीला आर्थर रोड जेलमध्ये पुरेसे उपचार आणि मानसिक आरोग्य सेवा दिली जाईल आणि त्याच्याकडून आत्महत्या होण्याचा कोणताही धोका नाही. भारताचे कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी या प्रकरणात प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केल्याचा नीरव मोदीचा बचाव दावाही न्यायाधीशांनी फेटाळला.

हिरा उद्योगपती नीरव मोदी सध्या लंडनच्या तुरूंगात बंद आहे. कोर्टाचा निकाल आता ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांच्या स्वाक्षर्‍यासाठी पाठविला जाईल. मात्र, नीरव मोदी अजूनही उच्च न्यायालयात अपील करणार असल्याची शक्यता आहे.

प्रत्यर्पण वॉरंटवरून 19 मार्च 2019 रोजी नीरव मोदीला अटक करण्यात आली होती आणि प्रत्यार्पणाच्या प्रकरणात अनेक सुनावणी दरम्यान वॅन्सवर्थ कारागृहातून व्हिडिओ लिंकद्वारे त्याचा सहभाग होता. जामीन घेण्याचे त्याचे अनेक प्रयत्न दंडाधिकारी न्यायालय आणि उच्च न्यायालयात नाकारले गेले आहेत. यामध्ये तो फरार होण्याचा धोका असल्याचे कोर्टाचे म्हणणे आहे. (हेही वाचा: मंत्र्यांनी चालवली स्कूटर, पाठिमागे बसल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी; पेट्रोल डिझेल दरवाढीचा हटके विरोध)

कोर्टाने म्हटले आहे की, प्रत्यार्पण झाल्यानंतर मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील बॅरेक 12 मध्ये निरवला ठेवावे. त्याला अन्न, शुद्ध पाणी, स्वच्छ शौचालय, पलंगाची सुविधा देण्यात यावी. मुंबई सेंट्रल जेलचे डॉक्टरही नीरवसाठी उपलब्ध असावेत.