Nepal's Revised Map: नेपाळ ऑगस्टच्या मध्यापर्यंत भारत, युएन, गुगलला पाठवणार सुधारित नकाशा; भारताच्या लिपुलेख, कालापाणी आणि लिम्पियाधुरा परिसरांचा समावेश
या वादग्रस्त नकाशामध्ये नेपाळ भारतातील तीन क्षेत्रांना आपले म्हणून दाखवत आहे. याबाबत नेपाळविरुद्ध भारतामध्ये कडाडून टीकाही झाली होती.
नेपाळने (Nepal) आपला नवीन नकाशा (New Map) प्रसिद्ध केला आहे. या वादग्रस्त नकाशामध्ये नेपाळ भारतातील तीन क्षेत्रांना आपले म्हणून दाखवत आहे. याबाबत नेपाळविरुद्ध भारतामध्ये कडाडून टीकाही झाली होती. आता या महिन्याच्या मध्यापर्यंत नेपाळ आपल्या देशाचा नवीन नकाशा भारत, संयुक्त राष्ट्र (UN), गुगल (Google) आणि अन्य आंतरराष्ट्रीय समुदायांना पाठवेल. शनिवारी (1 ऑगस्ट) नेपाळचे भू-व्यवस्थापन मंत्री (Minister for Land Management), पद्म अर्याल (Padma Aryal) यांनी वृत्तसंस्था एएनआयला ही माहिती दिली.
नेपाळच्या नवीन नकाशात भारताच्या महत्वपूर्ण तीन क्षेत्रांचा- लिपुलेख (Lipulekh), कालापाणी (Kalapani) आणि लिम्पियाधुरा (Limpiyadhura) समावेश आहे. ही तिन्ही ठिकाणे सध्या उत्तराखंड, भारतामध्ये असून ती भारताच्या ताब्यात आहेत. नेपाळदेखील हा आपला प्रदेश असल्याचे मानत आहे, परंतु नेपाळने प्रथमच या क्षेत्राला आपल्या अधिकृत नकाशामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी (Bidhya Devi Bhandari) यांनी 18 जून रोजी नकाशाबाबतच्या संविधान दुरुस्ती विधेयकास मंजुरी दिली.
एएनआत ट्वीट -
नेपाळच्या नकाशामध्ये बदल आणि काही भारतीय प्रदेशांचा नकाशामध्ये समावेश करण्यासाठी, नेपाळ संसदेच्या खालच्या सभागृहात या संदर्भातील घटना दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यावर, 13 जून रोजी भारताने प्रतिक्रिया व्यक्त केली की, हे कृत्रिम विस्तार पुरावा आणि ऐतिहासिक वस्तुस्थितीवर आधारित नाही. हा नकाशा 'वैध' नाही. नोव्हेंबर 2019 मध्ये भारताने एक नवीन नकाशा प्रसिद्ध केला होता, त्यानंतर सुमारे सहा महिन्यांनंतर नेपाळने या वर्षाच्या मे महिन्यात देशाचा सुधारित राजकीय आणि प्रशासकीय नकाशा जाहीर केला. (हेही वाचा: नेपाळच्या नवीन नकाशाला राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची मंजुरी; भारताच्या लिपुलेख, कालापाणी आणि लिम्पियाधुरा परिसरांचा समावेश)
नेपाळी मोजमाप विभागाचे माहिती अधिकारी दामोदर ढकाल म्हणाले की, नेपाळच्या नवीन नकाशाच्या 4000 प्रती इंग्रजीमध्ये प्रकाशित करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. देशात वितरण करण्यासाठी नेपाळी भाषेत सुमारे 25000 प्रती आधीच प्रकाशित झाल्या आहेत. नेपाळी भूमी व्यवस्थापन विभागाचे मंत्री पद्म अर्याल म्हणाले की, हा नकाशा इंग्रजीत प्रकाशित झाल्यानंतर ऑगस्टच्या मध्यापर्यंत तो आंतरराष्ट्रीय समुदायाला पाठविला जाईल.