Long Covid-19 Infection: कोविड-19 चा दीर्घकाळ संसर्ग असणाऱ्या लोकांमध्ये आढळू शकतात 200 हून अधिक लक्षणे; Lancet च्या अभ्यासामध्ये खुलासा
या सर्वेक्षणात 18 वर्षांवरील आणि ज्यांमध्ये बराच काळ कोविडची लक्षणे होती, अशा लोकांचा समावेश करण्यात आला होता
कोरोना विषाणूसंदर्भात (Coronavirus) एक नवीन संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनात, बऱ्याच दिवसांपासून संसर्ग असणाऱ्या लोकांमध्ये दिसणारी लक्षणे सांगण्यात आली आहेत. कोविड-19 शी संबंधित नवीन संशोधन अहवालात म्हटले गेले आहे की, जे लोक दीर्घ काळापासून या आजाराने ग्रस्त आहेत, त्यांच्यात 200 पेक्षा जास्त लक्षणे दिसतात. लॅनसेट जर्नल EClinicalMedicine या विज्ञान मासिकामध्ये गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या संशोधन अहवालात असे म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग ज्यांना दीर्घ काळापासून झाला आहे अशा लोकांच्या 10 अवयवांच्या प्रणालींमध्ये 203 लक्षणे आढळली आहेत.
यापैकी, 66 लक्षणांवर सात महिन्यांसाठी परीक्षण केले गेले. या अभ्यासात 56 देशांतील 3,762 लोकांचा समावेश आहे. अहवालात म्हटले आहे की, या लक्षणांमध्ये थकवा, दृष्टीमध्ये फरक, एखादा अवयव थरथरणे, खाज सुटणे, मासिक पाळीतील बदल, लैंगिक निष्क्रियता, ह्रदयाचा त्रास, विसरणे, अस्पष्ट दृष्टी, अतिसार, टिनिटस इत्यादींचा समावेश आहे. ही लक्षणे कोणत्याही रूग्णात कमीतकमी 6 महिने राहू शकतात किंवा रुग्णाला त्यापेक्षा जास्त काळ अशा समस्येचा सामना करावा लागू शकतो.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील न्यूरो सायंटिस्ट अथीना अकरमी म्हणाल्या की, दीर्घकालीन कोविड संसर्ग असण्याबाबत बरीच चर्चा झाली आहे, परंतु अशा लोकांवर फार कमी अभ्यास केला गेला आहे. या सर्वेक्षणात 18 वर्षांवरील आणि ज्यांमध्ये बराच काळ कोविडची लक्षणे होती, अशा लोकांचा समावेश करण्यात आला होता. सर्वेक्षण दरम्यान, 257 प्रश्न विचारले गेले. या सर्वेक्षणात सहभागी लोक 28 दिवसांपेक्षा जास्त काळ व्हायरसशी झुंज देत होते. या सर्वांमध्ये डिसेंबर 2019 ते मे 2020 दरम्यान लक्षणे दिसू लागली होती.
आधीच्या अभ्यासानुसार, असे आढळले होते की प्रत्येक सातपैकी एका व्यक्तीमध्ये संसर्ग झाल्यानंतर 12 आठवड्यांपर्यंत लक्षणे दिसू शकतात. याचा अर्थ, सुमारे 12 टक्के लोकांनी 12 आठवड्यांनंतरही लक्षणे दर्शविली. अभ्यासामध्ये असा सल्ला देण्यात आला आहे की, नॅशनल स्क्रीनिंग प्रोग्रामच्या मदतीने हे कळू शकते की किती लोक दीर्घकाळ कोविडशी सामना करीत आहेत, त्यांच्यात कोणत्या प्रकारची लक्षणे दिसून येत आहेत, त्यांना कोणत्या प्रकारच्या उपचारांची आवश्यकता आहे आणि या औषधांद्वारे ते किती दिवसांत बरे होऊ शकतात. (हेही वाचा: सध्या जग कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे; WHO ने व्यक्त केली चिंता)
3762 रुग्णांपैकी 2454 रुग्ण असे होते, ज्यांमध्ये ही लक्षणे 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ दिसून आली होती. सातव्या महिन्यापर्यंत या रुग्णांमध्ये सरासरी 13.8 लक्षणे आढळली आहेत.