'Kent' Covid-19 Variant: संपूर्ण जगभरात पसरेल कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट; तब्बल 10 वर्षे चालेल व्हायरसविरुद्धची लढाई- ब्रिटीश शास्त्रज्ञाचा दावा

ज्यांच्यासाठी पुन्हा नव्याने लस तयार कराव्या लागतील आणि लोकांना पुन्हा बूस्टर शॉट्सची आवश्यकता भासेल

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

सध्या जगामध्ये कोरोना विषाणूचे (Coronavirus) प्रमाण जरी कमी होत असले तरी, अजूनही या व्हायरसचा धोका टळला नाही. काही देशांमध्ये या विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने संसर्गाच्या चिंता अजून वाढल्या आहेत. आता कोरोना विषाणूबद्दल ब्रिटीश शास्त्रज्ञाने मोठा दावा केला आहे. ब्रिटिश शास्त्रज्ञाने म्हटले आहे की, इंग्लंडच्या केंट (Kent) येथे आढळलेले कोरोना विषाणूचे नवे रूप  संपूर्ण जगभर पसरेल आणि यामुळे जगाची कोरोना विषाणूविरूद्धची लढाई किमान दहा वर्षांपर्यंत चालेल. ब्रिटनच्या आनुवंशिक सर्व्हेलंस कार्यक्रमाच्या प्रमुखांच्या हवाल्याने आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सने हा अहवाल दिला आहे.

कोविड-19 जेनोमिक्स यूके कन्सोर्टियमचे संचालक शेरॉन पीकॉक यांनी एका माध्यम अहवालात म्हटले आहे की, केंट कोरोना विषाणूचा प्रकार संपूर्ण ब्रिटनमध्ये पसरला आणि आता तो जगातही पसरण्याची शक्यता आहे. ब्रिटीश शास्त्रज्ञ म्हणाले की, 'एकदा का आपण या विषाणूच्या मुळापर्यंत पोहोचलो किंवा स्वतःस या विषाणूजन्य आजारापासून मुक्त केले की मग आपण त्याबद्दल चिंता करणे थांबवू शकतो. पण मला वाटते की भविष्यात वर्षानुवर्षे हे शक्य नाही व कदाचित या विषाणूविरूद्ध लढा 10 वर्षे सुरू राहील.’

कोरोना व्हायरसने 2.35 दशलक्ष लोकांचा बळी घेतला आहे आणि कोट्यावधी लोकांचे सामान्य जीवन बदलले आहे, परंतु आता काही नवीन चिंताग्रस्त प्रकारांची भीती निर्माण झाली आहे. ज्यांच्यासाठी पुन्हा नव्याने लस तयार कराव्या लागतील आणि लोकांना पुन्हा बूस्टर शॉट्सची आवश्यकता भासेल. महत्वाचे म्हणजे काही आठवडे आणि महिन्यांमध्ये या व्हायरसच्या प्रकाराचे रूप बदलत आहे. पुढे त्याचे नवीन उत्परिवर्तन सुरू होत आहे, ज्यामुळे लसची कार्यक्षमता आणि प्रतिकारशक्तीच्या दृष्टीने व्हायरसच्या हाताळण्याच्या पद्धतीवर परिणाम होऊ शकतो. (हेही वाचा: वुहानच्या लॅबमधून लीक झाला नाही Coronavirus, डिसेंबर 2019 पूर्वी तो चीननमध्ये असल्याचा पुरावाही नाही- WHO)

दक्षिण-पश्चिम इंग्लंडमधील ब्रिस्टल येथे प्रथम ओळखल्या गेलेल्या या नव्या उत्परिवर्तनाला न्यू आणि इमर्जिंग रेस्पीरेटरि व्हायरस थ्रेट्स एडव्हायझरी ग्रुपने 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न' म्हटले आहे. या व्हेरिएंटचे 21 रुग्ण आढळून आले असून, ज्यामध्ये E484K म्युटेशन आहेत.