हा आहे जगातील सर्वात महागडा घटस्फोट; एका अफेअरमुळे तुटला 25 वर्षांचा संसार
यानंतर जेफची पत्नी ही जगातील सर्वात श्रीमंत महिला बनेल
जेफ बेझोस (Jeff Bezos), ऑनलाईन शॉपिंग कंपनी अॅमेझॉन (Amazon) चा मालक, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. सोमवारी शेअर बाजारात घडलेल्या उलाढालीमुळे, रातोरात जेफ बिल गेट्सला मागे टाकून सर्वात श्रीमंत बनला. आता या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा घटस्फोट होऊ घातलाय. जेफ आणि त्याची पत्नी मॅकेन्झी बेझोस (MacKenzie Bezos) यांनी त्यांचा 25 वर्षांचा संसार मोडायचे ठरवेल आहे. नुकतेच या आशयाचे ट्वीटही त्यांनी केले होते. या घटस्फोटामुळे जेफच्या संपत्तीची विभागणी झाली तर, हा घटस्फोट जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरणार आहे. यानंतर जेफची पत्नी ही जगातील सर्वात श्रीमंत महिला बनेल. पैशांच्या बाबतीत ती मुकेश अंबानी यांनादेखील मागे टाकणार आहे.
वॉशिंग्टन (Washington)च्या कायद्यानुसार घटस्फोटानंतर पतीच्या मालमत्तेवर पत्नीचा समान अधिकार असतो. एका रिपोर्टनुसार जेफ यांची संपूर्ण मालमत्ता ही 137 बिलियन डॉलर्स इतकी आहे. घटस्फोटानंतर मॅकेन्झी यांना त्यातील अर्धी रक्कम मिळणार आहे. सध्या जगातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून अॅलिस वॉल्टन (Alice Walton) हिच्याकडे पहिले जाते. ती वॉलमार्ट कंपनीची वारस आहे. मात्र आता काहीही न करता मॅकेन्झी ती जागा घेतील. (हेही वाचा : Amazon ठरली जगातील सर्वात मोठी खाजगी कंपनी; भांडवल पाहाल तर डोळे पांढरे होतील)
जेफ यांचे त्यांच्या मित्राच्या पत्नीशी अफेअर सुरु असल्यामुळेच मॅकेन्झीने जेफला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. या महिलेचे लॉरेन सांचेझ (49) असे असून, ती माजी न्यूज अँकर आहे. दरम्यान भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची संपत्ती 4,470 कोटी डॉलर्स इतकी आहे. मात्र जेफ यांच्या घटस्फोटानंतर मॅकेन्झी यांना यापेक्षा कितीतरी अधिक रक्कम मिळण्याची शक्यता आहे.