Israel-Hamas War: 'गाझा बनले हजारो मुलांसाठी स्मशानभूमी'; UN ने व्यक्त केली चिंता

25,000 हून अधिक पॅलेस्टिनी जखमी झाले आहेत. गाझामधील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हल्ल्यात नष्ट झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली 1,000 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत.

Israel-Hamas War (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या संपूर्ण जगात इस्रायल आणि हमास युद्धाबाबत (Hamas-Israel War) काळजी व्यक्त केली जात आहे. या युद्धामुळे मानव जातीचे कधीही न भरून काढता येईल असे नुकसान झाल्याचे मत व्यक्त केले जात आहे. युनायटेड नेशन्स एजन्सी युनिसेफने इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात मारल्या गेलेल्या अल्पवयीन मुलांची वाढती संख्या भयानक असल्याचे वर्णन केले आणि म्हटले की, गाझा हजारो मुलांचे स्मशान बनले आहे.

युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड (युनिसेफ) ने गाझा पट्टीमध्ये इस्रायलच्या सततच्या बॉम्बफेकीमुळे मुलांच्या मृत्यूच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली आहे. युनिसेफचे प्रवक्ते जेम्स एल्डर यांनी स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा शहरात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, गाझामधील मुले केवळ हवाई हल्ल्यांमुळेच नव्हे तर वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळेही मृत्युमुखी पडत आहेत.

या ठिकाणी मुलांच्या मृत्यूची संख्या 3,450 पेक्षा जास्त झाली आहे. ही संख्या दररोज वाढत आहे. जेम्स एल्डर यांनी इशारा दिला की, गाझा लहान मुलांसाठी स्मशानभूमी बनले आहे, तर जे लोक वाचले त्यांच्यासाठी ते नरक बनले आहे. आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, गाझामध्ये गेल्या चार वर्षांतील जागतिक संघर्षांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या एकूण संख्येपेक्षा तीन आठवड्यांत अधिक मुले मारली गेली आहेत.

सध्या गाझामध्ये पिण्याची पाण्याची कमतरता आहे. गाझामधील 1 दशलक्षाहून अधिक मुलांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे, असा इशारा युएनने दिला. गाझाचे दैनंदिन पाणी उत्पादन त्याच्या उत्पादन क्षमतेच्या फक्त 5 टक्के आहे. त्यामुळे डिहायड्रेशन आणि तहान लागल्याने बालकांचाही मृत्यू होत आहे. जेम्स एल्डर म्हणाले की, जेव्हा लढाई थांबेल तेव्हा त्याचे परिणाम मुलांच्या भावी पिढ्यांना आणि त्यांच्या समाजाला भोगावे लागतील. (हेही वाचा: Israel Hamas War: इस्रायलचा हवाई हल्ल्यात 'हमास'चा टॉप कमांडर इब्राहिम बियारी ठार)

एल्डरने जोर दिला की, लढाई सुरू होण्यापूर्वी गाझामधील 8 दशलक्षाहून अधिक मुलांना मानसिक आरोग्य आणि मानसिक आधाराची गरज असल्याचे समोर आले होते. आपल्या टिप्पण्यांमध्ये, एल्डर यांनी गाझाला तात्काळ युद्धविराम देण्याच्या आणि मानवतावादी मदत करण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. दरम्यान, इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला 26 दिवस झाले आहेत. गाझा पट्टीतील सततच्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत सुमारे 3,500 मुलांसह 9 हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 25,000 हून अधिक पॅलेस्टिनी जखमी झाले आहेत. गाझामधील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हल्ल्यात नष्ट झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली 1,000 हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत.