Moscow Concert Hall Attack: इस्लामिक स्टेटने स्वीकारली मॉस्कोच्या कॉन्सर्ट हॉलवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी; आतापर्तंत 60 जणांचा मृत्यू, 145 जखमी
सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये इमारतीवर धुराचे प्रचंड लोट उठताना दिसत आहेत.
Moscow Concert Hall Attack: इस्लामिक स्टेट (Islamic State) ने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या निवेदनात मॉस्कोमधील हल्ल्याची (Moscow Concert Attack) जबाबदारी स्वीकारली आहे. संघटनेने आपल्या अमाक वृत्तसंस्थेवर एक निवेदन पोस्ट करून हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. निवेदनात, दहशतवादी संघटनेने म्हटले आहे की, त्यांनी रशियाची राजधानी मॉस्कोच्या बाहेरील क्रास्नोगोर्स्क शहरात ख्रिश्चनांच्या मोठ्या सभेवर हल्ला केला, ज्यात अनेक लोक मारले गेले आणि शेकडो जखमी झाले.
रशियाच्या FSB फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसचा हवाला देत बीबीसी आणि रॉयटर्सने वृत्त दिले की, शुक्रवारी रात्री मॉस्कोजवळील एका कॉन्सर्ट हॉलमध्ये सशस्त्र पुरुषांच्या गटाने गोळीबार केल्याने 60 हून अधिक लोक ठार झाले. तसेच या हल्ल्यात 145 जण जखमी झाले. रशियन बातम्यांनुसार, दहशतवाद्यांनी स्फोटके फेकली, ज्यामुळे मॉस्कोच्या पश्चिमेकडील क्रोकस सिटी हॉलमध्ये मोठी आग लागली. सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये इमारतीवर धुराचे प्रचंड लोट उठताना दिसत आहेत. (हेही वाचा -Moscow Firing In Concert Hall: मॉस्को येथील कॉन्सर्ट हॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार; 10 जण ठार, अनेक जखमी झाल्याचे वृत्त)
हल्ला करणारे दहशतवादी कोणत्या दिशेने गेले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी ही 'मोठी शोकांतिका' असल्याचे म्हटले आहे. रशियाची सर्वोच्च तपास संस्था या हल्ल्याचा दहशतवादी हल्ला म्हणून तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या हल्ल्याचे वर्णन रशियातील दोन दशकांतील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला म्हणून केले जात आहे. (वाचा - PM Modi condemns Moscow Attack: मॉस्को वरील दहशतवादी हल्ल्याचा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून निषेध!)
आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू -
क्रेमलिनने जारी केलेल्या निवेदनात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना हल्ल्याची संपूर्ण माहिती देण्यात आल्याचे म्हटले आहे. रशियन रॉक बँड पिकनिकच्या कार्यक्रमासाठी जमाव जमला असताना हा हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच बंदुकधारी क्राको सिटी कॉन्सर्ट हॉलमध्ये घुसले आणि त्यांनी स्वयंचलित शस्त्रांनी लोकांच्या जमावावर गोळीबार केला, ज्यात किमान 60 लोक ठार झाले. तसेच 145 हून अधिक लोक जखमी झाले. या हल्ल्यात हल्लेखोरांनी स्फोटकांचाही वापर केला.