Iran Mass Execution: इराणने व्यभिचाराबाबत सुनावली अतिशय निर्दयी शिक्षा; 51 लोकांना दगडाने ठेचून मारले- Report

द सनने प्राप्त केलेल्या दस्तऐवजांवरून असे दिसून आले आहे की, 25 ते 59 वयोगटातील 51 पुरुष आणि स्त्रिया यांना सप्टेंबर 2020 मध्ये तुरुंगात ठेवण्यात आले होते

Ebrahim Raisi (संग्रहित संपादित प्रतिमा)

मुस्लिमबहुल राष्ट्र असलेल्या इराणमधील (Iran) कडक कायद्यांबाबत आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. आता इराणमध्ये वैवाहिक नात्यात जोडीदाराची फसवणूक (Adultery) केल्याप्रकरणी 51 जणांना मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इराणने या लोकांना सहज मृत्यू न देण्याचा निर्धार केला होता. या लोकांना दगडाने ठेचून (Death By Stoning) मारण्यात आले. इराणमध्ये मानवी हक्कांच्या उल्लंघनाशी संबंधित गुप्त कागदपत्रे लीक झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. या लोकांना शरिया कायद्यानुसार शिक्षा सुनावण्यात आली आहे.

द सनच्या रिपोर्टनुसार, एकूण 23 महिला आणि 28 पुरुषांनी ही भयानक शिक्षा भोगली. त्यापैकी अनेक जण अवघ्या 20-30 वर्षांच्या दरम्यानचे होते. इराण हा इस्लामिक देश आहे व येथे शरिया कायद्यानुसार गुन्ह्याला शिक्षा दिली जाते. इस्लामिक न्यायाधीश व्यभिचाराबद्दल शून्य-सहिष्णुतेचा दृष्टीकोन अवलंबतात. कुराणात व्यभिचार हे गंभीर पाप मानले गेले आहे.

कायद्यानुसार, या लोकांना दगडाने ठेचल्यानंतर त्यांना कापडात गुंडाळले गेले आणि नंतर त्यांना कमरेपर्यंत वाळूत गाडण्यात आले. जिथे कमरेचा वरचा भाग मातीच्या वर राहतो. त्यानंतर पीडिताचा मृत्यू होईपर्यंत त्याच्यावर दगडफेक केली गेली. ही प्रचंड निर्दयी शिक्षा आहे कारण अशा प्रकारच्या शिक्षेमध्ये अनेकवेळा पीडितांना दीर्घकाळ मृत्यूची प्रतीक्षा करावी लागते. मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये इराण आघाडीवर मानला जातो. इराणमध्ये दरडोई फाशीचा दर सर्वाधिक आहे. (हेही वाचा: Texas School Shooting: 18 वर्षीय तरूणाकडून अमेरिकेत शाळेत गोळीबार; 18 विद्यार्थी ठार)

दरम्यान, 1979 च्या क्रांतीनंतर इराणमध्ये दगडफेक करून मृत्यूची शिक्षा लागू झाली होती. 2002 मध्ये न्यायव्यवस्थेने या नीच प्रथेवर स्थगिती आणली, तरीही अजूनही ही दुष्ट अंमलात आणली जात आहे. क्रूर इराणी कायद्यांतर्गत, बलात्कार, व्यभिचार, सशस्त्र दरोडा आणि हत्या हे अशा गुन्ह्यांपैकी एक आहेत ज्यामुळे मृत्यूदंड होऊ शकतो. द सनने प्राप्त केलेल्या दस्तऐवजांवरून असे दिसून आले आहे की, 25 ते 59 वयोगटातील 51 पुरुष आणि स्त्रिया यांना सप्टेंबर 2020 मध्ये तुरुंगात ठेवण्यात आले होते. या 51 लोकांना ही निर्दयी शिक्षा देण्यात आली. त्यावेळी इराणचा अध्यक्ष इब्राहिम रायसी मुख्य न्यायाधीश होता.