Iran Holds Back Hijab Law: आंदोलन करणाऱ्या महिलांसमोर झुकले इराण सरकार; हिजाबशी संबंधित वादग्रस्त कायदा घेतला मागे

यामध्ये दंड आणि 15 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा समाविष्ट आहे. गेल्या शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी होणार होती.

Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

Iran Hijab Law: महिलांच्या हिजाबशी संबंधित अतिशय कठोर वादग्रस्त कायदा (Hijab Law) इराणने (Iran) 'काही काळासाठी' बंद केला आहे. इराणमध्ये 2022 पासून हिजाबचा वाद सुरू आहे, ज्याची सुरुवात महसा ‘झिना’ अमिनीच्या मृत्यूपासून झाली. हिजाब ड्रेस कोडचे उल्लंघन केल्याने महसाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने संपूर्ण इराणमध्ये खळबळ उडाली आहे. सरकारला आव्हान देत महिलांनी आंदोलन सुरू केले आणि हिजाबचे नियम मोडण्यास सुरुवात केली. हिजाबसंबंधी कठोर नियमामुळे इराणला जगभरातून टीकेला सामोरे जावे लागले होते.

इराणमधील ज्या मुली आणि महिला आपले केस, गुडघ्याखालील पाय, हात पूर्णपणे झाकत नाहीत त्यांच्यासाठी कठोर दंड प्रस्तावित आहे. यामध्ये दंड आणि 15 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा समाविष्ट आहे. गेल्या शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी होणार होती. मात्र इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने या वादग्रस्त कायद्यावर बंदी घातली आहे.

अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांचा हिजाब कायद्याला विरोध-

अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी यापूर्वीही याला विरोध केला होता. विधेयकात प्रस्तावित केलेली शिक्षा मसूद पेजेश्कियान यांनी फेटाळली. हा कायदा ‘अस्पष्ट आहे आणि त्यात सुधारणा आवश्यक आहे’, असे म्हटले आहे. पेजेश्कियान म्हणाले होते, ‘ज्याप्रमाणे ते पूर्वी महिलांच्या डोक्यावरून जबरदस्तीने हिजाब काढू शकत नव्हते, त्याच प्रकारे ते आता त्यांच्यावर लादू शकत नाहीत. आम्हाला आमच्या महिला आणि मुलींवर आमची इच्छा लादण्याचा अधिकार नाही.’ (हेही वाचा: Same-Sex Marriage: समलिंगी विवाह बंदी असंवैधानिक, जपानमधील फुकुओका उच्च न्यायालयाचा निर्णय)

पेझेश्कियान यांनी या वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्रपती पदाच्या प्रचारादरम्यान हिजाबवर महिलांशी केलेल्या गैरवर्तनाबद्दल नापसंती व्यक्त केली होती. मानवाधिकार संघटना ॲम्नेस्टी इंटरनॅशनलने या नियमाबाबत म्हटले होते की, इराणी अधिकारी 'दडपशाहीच्या आधीच दडपलेल्या व्यवस्थेला बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत'. दरम्यान, 2022 पासून इराणमध्ये हिजाबचा वाद सुरू आहे. महसा अमिनीच्या मृत्यूनंतर महिलांनी सरकारला आव्हान देत हिजाबच्या नियमांचे उल्लंघन केले. सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या जवळच्या गटांकडून निर्बंध आणि दबाव असूनही, इराणमधील महिला निर्भय दिसल्या आणि या निर्बंधांच्या विरोधात उभ्या राहिल्या.