Indonesia Plane Crash: इंडोनेशियाच्या बोईंग 737 विमानाच्या शोधकार्यादरम्यान सापडले शरीराचे अवयव, कपड्यांचे तुकडे व इतर अवशेष

इंडोनेशियाच्या परिवहन मंत्र्यांनी सांगितले की, एअरलाइन्सचे हे बोईंग 737-500 विमान (एसजे182) स्थानिक वेळेनुसार दुपारी 2.36 वाजता जकार्ताहून निघाले आणि चार मिनिटानंतरच रडारवरून गायब झाले.

Sriwijaya Air. (Photo Credits: Twitter)

इंडोनेशियाची (Indonesia) राजधानी जकार्ता येथून उड्डाण घेतल्यानंतर श्रीविजया एयरलाईन्सचे विमान SJ182, Boeing 737-500 ताबडतोब बेपत्ता झाले होते. टेकऑफच्या अवघ्या चार मिनिटानंतर हे विमान समुद्रात कोसळले. विमानात 12 चालक दल सदस्यांसह 62 प्रवासी होते. या विमानाचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. त्याचवेळी या विमानाच्या काही संशयित अवशेषांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या शोधकार्यात इंडोनेशियन बचावकर्त्यांनी जावा समुद्रातून शरीराचे अवयव, कपड्यांचे तुकडे आणि धातूचे भंगार बाहेर काढले आहे. परंतु अद्याप या विमानाच्या अपघाताची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

सुरुवातीच्या अहवालांमध्ये म्हटले होते की, श्रीविजया विमानाने जकार्ताच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर चार मिनिटांत एका मिनिटापेक्षा कमी वेळेत 10,000 फुट उंचीवर गेल्यावर त्याचा संपर्क तुटला होता. शेवटच्या संपर्काच्या वेळी हे विमान 11,000 फूट उंचीवर होते. इंडोनेशियाचे परिवहन मंत्री बुडी कार्या सुमादी यांनी सांगितले की, एअरलाइन्सचे हे बोईंग 737-500 विमान (एसजे182) स्थानिक वेळेनुसार दुपारी 2.36 वाजता जकार्ताहून निघाले आणि चार मिनिटानंतरच रडारवरून गायब झाले. (हेही वाचा: जकार्ताहून उड्डाण केलेले Sriwijaya चे विमान SJ182 रडारवरून एकाएकी झाले गायब)

एअरलाइन्सने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे विमान जकार्ताहून बोर्निओ बेटावर पश्चिम कालीमंतन प्रांताची राजधानी पोंटिआनाककडे जात होते आणि हा प्रवास सुमारे 90 मिनिटांचा होता. नोंदणी दस्तऐवजानुसार, बोईंग 737-500 विमान 26 वर्षांचे होते. श्रीविजया एअरलाइन्सचे सीईओ जेफरसन इर्विन ज्युवेना यांनी पत्रकारांना सांगितले की विमानाची स्थिती उत्तम होती. मुसळधार पावसामुळे उड्डाण घेण्यास 30 मिनिटांचा उशीर झाल्याचेही त्यांनी सांगितले. आता या विमानाबाबत शोध सुरु असताना, विमानाचे अवशेष व काही शरीराचे अवयव सापडले आहेत. मात्र याबाबत अधिकृरीत्या पुष्टी केली गेली नाही.