पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय पायलट अभिनंदन यांची उद्या होणार सुटका: इम्रान खान
दोन्ही देशांमध्ये शांती राहावी म्हणून पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय पायलट विंग कमांडर अभिनंदन (Wing Commander Abhinandan) यांना उद्या सोडण्यात येईल असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी सांगितले आहे. दोन्ही देशांमध्ये शांती राहावी म्हणून पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. पुलवामा हल्ला झाल्यानंतर, भारताने सर्जिकल स्ट्राईक करून काश्मीर व्याप्त पाकिस्तानमध्ये शिरून दहशतवादी संघटनांचे तळ नष्ट केले होते. त्यानंतर दोन्ही देशांमधील परिस्थिती बरीच चिघळली. चिडलेल्या पाकिस्तानकडून चकमकी आणि हल्ले सुरु झाले.
बुधवारी सकाळी पाकिस्तानी विमाने भारताच्या हद्दीत घुसून आली, या विमानांना भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिले. पण या दरम्यान दोन भारतीय मिग -21 त्यांचा पाठलाग करत पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेली. त्यावेळी भारतीय पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्तमानला पाकिस्तानी सैनिकांनी पकडले. त्यानंतर अभिनंदनला सोडवण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरु झाले. अखेर आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी उद्या अभिनंदनला सोडण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
‘दोन्ही देशांमध्ये शांततापूर्ण वातावरण राहावे म्हणून आम्ही अभिनंदनला उद्या सोडत आहोत’ असे इम्रान खान यांनी सांगितले. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी गुरुवारी सांगितले होते की, इम्रान खान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी टेलिफोनिक संभाषणासाठी तयार आहेत. दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित राहावी हाच आमचाही प्रयत्न आहे.
अभिनंदनच्या सुटकेसाठी भारतासोबत तडजोड करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता. मात्र अभिनंदनची कुठल्याही अटींशिवाय तात्काळ सुटका करा असे भारताने पाकिस्तानला बजावले होते, त्यानुसार उद्या अभिनंदन यांची सुटका होणार आहे.