
फ्रान्स (France) सरकारने 1 जुलै 2025 पासून सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर (Smoking) बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला आहे. देशातील समुद्रकिनारे, उद्याने, शाळांच्या आसपासच्या परिसरात, बस थांबे आणि क्रीडा मैदानांसारख्या सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे गुन्ह्याच्या कक्षेत येणार आहे. या नव्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 135 युरो (सुमारे 13,0000 रुपये) दंड आकारला जाईल. फ्रान्सच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री कॅथरीन व्हॉट्रिन यांनी या निर्णयाची घोषणा करताना सांगितले की, मुलांना तंबाखूच्या धुरापासून वाचवणे आणि त्यांना स्वच्छ हवा मिळवून देणे हा या बंदीचा मुख्य उद्देश आहे.
फ्रान्समधील सिगारेटच्या धुरामुळे दरवर्षी 75,000 लोकांचा मृत्यू होतो, आणि हा नियम तंबाखूजन्य आजार कमी करण्याच्या मोठ्या योजनेचा भाग आहे. जे पर्यटक फ्रान्सला भेट देण्याचा विचार करत आहेत आणि जे धुम्रपान करतात, त्यांच्यासाठी हा नियम महत्वाचा असू शकतो. 1 जुलै 2025 पासून फ्रान्समधील अनेक सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान पूर्णपणे बंद होईल. यामध्ये समुद्रकिनारे, सार्वजनिक उद्याने, शाळांच्या बाहेरील परिसर, बस थांबे, क्रीडा मैदाने आणि मुलांच्या उपस्थितीची शक्यता असलेली इतर ठिकाणे समाविष्ट आहेत.
हा नियम मुलांना सिगारेटच्या धुरापासून संरक्षण देण्यासाठी आहे, कारण धुरामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. फ्रान्सच्या आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले की, ‘जिथे मुले असतील, तिथे तंबाखूला स्थान नाही. धूम्रपानाचा अधिकार तिथे संपतो, जिथे मुलांचा स्वच्छ हवा श्वास घेण्याचा हक्क सुरू होतो.’ या बंदीमध्ये काही अपवादही आहेत. फ्रान्समधील प्रसिद्ध कॅफे टेरेस, जिथे लोक कॉफी आणि सिगारेटचा आनंद घेतात, त्यांना या नियमातून सूट देण्यात आली आहे. याशिवाय, इलेक्ट्रॉनिक सिगारेट (ई-सिगारेट) या बंदीच्या कक्षेत येत नाहीत, परंतु त्यातील निकोटीनच्या मात्रेवर मर्यादा घालण्यासाठी सरकार काम करत आहे. (हेही वाचा: Bodybuilding Linked To Sudden Cardiac Deaths: पुरुष बॉडीबिल्डर्समध्ये वाढला अचानक हृदयविकाराचा धोका; समोर आली तणाव, स्टिरॉइड्ससह अनेक कारणे, जाणून घ्या काय सांगतो अभ्यास)
उल्लंघन करणाऱ्यांना 135 युरो दंड आकारला जाईल, आणि पोलीस नियमित या बंदीची अंमलबजावणी करतील. फ्रान्समध्ये तंबाखू हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे, आणि दरवर्षी हजारो लोक तंबाखूशी संबंधित आजारांमुळे मृत्युमुखी पडतात, जे देशातील एकूण मृत्यूंपैकी 13% आहे. फ्रेंच मॉनिटरिंग सेंटर फॉर ड्रग्स अँड ड्रग अॅडिक्शनच्या मते, 23.1% फ्रेंच प्रौढ रोज धूम्रपान करतात, जे 2014 पासून पाच टक्क्यांनी कमी झाले आहे. तरीही, तंबाखूजन्य आजारांचे प्रमाण चिंताजनक आहे, विशेषतः मुलांवर होणाऱ्या परिणामांमुळे. फ्रान्स सरकार 2032 पर्यंत ‘तंबाखूमुक्त पिढी’ निर्माण करण्याच्या उद्देशाने काम करत आहे.