अमेरिकेची अंतराळ मोहीम; चंद्रावर पाऊल ठेवणारी जगातील पहिला महिला ठरणार अमेरिकन

विशेष म्हणजे या मोहिमेद्वारे चंद्रावर पाऊल ठेवणारी जगातील पहिला महिला ही अमेरिकन महिला ठरणार आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी सोमवारी याबाबत घोषणा केली

प्रातिनिधिक प्रतिमा - चंद्र (Photo Credit : Youtube)

अमेरिकन अंतराळ संशोधन केंद्र, ‘नासा’ (NASA) द्वारे आज अंतराळातील अनेक गूढ रहस्ये आपल्या समोर आली आहेत. प्रत्येक अंतराळ मोहिमेतून माहितीचे नवी कवाडे उघडली गेली आहेत. आताही अमेरिका अजून एका चांद्रयान मोहिमेची तयारी करत आहे. विशेष म्हणजे या मोहिमेद्वारे चंद्रावर पाऊल ठेवणारी जगातील पहिला महिला ही अमेरिकन महिला ठरणार आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स (Mike Pence) यांनी सोमवारी याबाबत घोषणा केली. वॉशिंग्टन येथे आयोजित केलेल्या उपग्रह 2019 (Satellite 2019) परिषदेत ते बोलत होते.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच्या (Donald Trump) निर्देशानुसार अमेरिका पुढील पाच वर्षांत पुन्हा एकदा चांद्रमोहीम करणार आहे. चंद्रावर पाऊल ठेवणारी जगातील पहिली व्यक्ती आणि पुरुष अमेरिकनच होता. आता चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली महिला ही सुद्धा अमेरिकन ठरणार आहे.  हे वर्ष संपायच्या आधी अमेरिकन अंतराळावीर, अमेरिकन रॉकेट्सद्वारे, अमेरिकेच्या भूमीतून पुन्हा एकदा अंतराळमोहीम सुरु करतील. (हेही वाचा: 9-16 जुलै दरम्यान होणार 'चांद्रयान 2' चं प्रक्षेपण, ISRO ची माहिती)

सध्या वॉशिंग्टन डीसीमध्ये 6 मेपासून सुरू झालेल्या या चार दिवसीय मेगा इव्हेंटमध्ये, भारतासह 105 देशांतील 15,000 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ आणि उद्योग प्रतिनिधी उपस्थित आहेत. हा सर्वात मोठा व्यावसायिक उपग्रह उद्योग कार्यक्रम असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान नुकतेच भारतानेही दुसऱ्या चंद्रयान मोहिमेची घोषणा नुकतीच केली आहे. चांद्रयान 2 ही मोहीम 9-16 जुलैच्या दरम्यान होणार असून, 6 सप्टेंबर 2019 पर्यंत हे चांद्रयान चंद्रावर पोहचेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.