Deltacron Variant: धक्कादायक! सायप्रसमध्ये आढळून आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'डेल्टाक्रॉन'; Delta आणि Omicron चे मिश्रण

ज्या 25 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 11 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 14 जण घरीच आयसोलेशनमध्ये राहत होते

Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

आधी डेल्टा त्यानंतर ओमायक्रॉन (Omicron) प्रकाराने जगात कहर माजवला आहे. आता सायप्रसमध्ये कोरोनाचा आणखी एक नवीन प्रकार समोर आले आहे. सायप्रसच्या एका संशोधकाने कोविड-19, डेल्टाक्रॉन (Deltacron) या नवीन व्हेरिएंटचा शोध लावला आहे, जो ओमायक्रॉन आणि डेल्टा प्रकारांचे मिश्रण असल्याचा दावा केला जातो. सायप्रसच्या स्थानिक बातम्यांनुसार, कोरोनाच्या या नवीन प्रकाराची अनुवांशिक पार्श्वभूमी देखील डेल्टा प्रकारासारखीच आहे, म्हणून त्याला डेल्टाक्रॉन असे नाव देण्यात आले आहे. सायप्रस मेलच्या बातमीनुसार, सायप्रस विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी आणि व्हायरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. लिओनडिओस कोस्ट्रिकिस यांनी सांगितले की, नवीन प्रकारांचे काही उत्परिवर्तन ओमायक्रॉन व्हेरियंटसारखेच आहेत.

सायप्रसमध्ये, कोरोना संक्रमित झालेल्या 25 नमुन्यांमध्ये आढळून आले की, यातील 10 उत्परिवर्तन ओमायक्रॉनचे होते. ज्या 25 जणांचे नमुने घेण्यात आले त्यापैकी 11 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 14 जण घरीच आयसोलेशनमध्ये राहत होते. कोस्ट्रिकिस म्हणाले की, जे कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होत आहेत, त्यांच्यात नवीन व्हेरिएंटची आणखी प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे. या नवीन प्रकारात डेल्टा आणि ओमायक्रॉन या दोन्हींचे उत्परिवर्तन आहे. सध्या त्यावर संशोधन केले जात असून, नवीन प्रकार किती धोकादायक आहे हे नंतर दिसेल. (हेही वाचा: Omicron: लहान मुलांना ओमिक्रॉनचा संसर्ग का होतोय? तज्ञांनी सांगितले कारण)

सायप्रसचे आरोग्य मंत्री मिखलिस हदजीपांडेलस म्हणाले की नवीन प्रकार सध्या चिंतेचे कारण नाही. या प्रकाराला अद्याप वैज्ञानिक नाव देण्यात आलेले नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी फ्रान्समध्ये कोरोनाचा आणखी एक नवीन प्रकार आढळून आला होता, त्याला आयएच असे नाव देण्यात आले. फ्रेंच शास्त्रज्ञांच्या मते, कॅमेरूनमधील काही लोकांमध्ये हा प्रकार ओळखला गेला. या प्रकारात 46 उत्परिवर्तन आढळून आले.