Covid-19 चाचणी करण्याची आहे ठराविक वेळ; दिवसातील वेळेनुसार बदलू शकतात निकाल- Study

चाचणी घेत असलेल्या व्यक्तीच्या 'जैविक घड्याळा' (Biological Clock) नुसार चाचणीचे निकाल देखील बदलू शकतात

प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Getty)

दिवसातील नक्की कोणत्या वेळी कोरोना विषाणू चाचणी (Covid-19 Test) केली जात आहे, यावर त्या कोरोना व्हायरस चाचणीची 'संवेदनशीलता' अवलंबून असू शकते. चाचणी घेत असलेल्या व्यक्तीच्या 'जैविक घड्याळा' (Biological Clock) नुसार चाचणीचे निकाल देखील बदलू शकतात. 'जर्नल ऑफ बायोलॉजिकल रिदम्स' या (Journal of Biological Rhythms) नियतकालिकात मंगळवारी प्रकाशित झालेल्या अभ्यासात हे आढळून आले आहे. अभ्यासात दिसून आले आहे की, जर एखाद्या व्यक्तीची रात्रीऐवजी दुपारच्या सुमारास चाचणी झाली, तर त्याच्या चाचणीत संसर्गाची अचूक पुष्टी होण्याची शक्यता दुप्पट वाढते.

संशोधकांनी सांगितले की, अभ्यासाचे निकाल या गृहितकाशी जुळतात की कोविड-19 विषाणू हा शरीराच्या सर्कॅडियन रिदमनुसार वेगवेगळ्यावेळी वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करतो. इतर व्हायरल आणि बॅक्टेरियाच्या संसर्गावरील अभ्यासाच्या  निकालांमध्येही हे आढळून आले आहे. सर्कॅडियन रिदम ही आपल्या शरीराची नैसर्गिक, अंतर्गत प्रक्रिया आहे, जी झोप व जागे राहणे अशा चक्राचे नियमन करते आणि साधारणपणे दर 24 तासांनी त्याची पुनरावृत्ती होते.

यूएसमधील वँडरबिल्ट विद्यापीठातील प्रोफेसर कार्ल जॉन्सन म्हणाले, 'कोविड -19 साठी दिवसाच्या योग्य वेळी चाचणी केल्याने चाचणीची संवेदनशीलता वाढते आणि लक्षणे नसलेल्या लोकांमध्ये संसर्ग शोधण्यात यामुळे मदत होऊ शकते. संशोधकांनी सांगितले की, परिणामांवरून असे दिसून आले आहे की रात्री 8 नंतर 'व्हायरल लोड' कमी होतो. दिवसभरात ‘कोविड-19 व्हायरल शेडिंगमधील फरक’ ही महत्त्वाची माहिती आहे, जी आपल्याला उपचारामध्ये मदत करू शकते असेही संशोधकांनी सांगितले. (हेही वाचा: Chine Lockdonw: चीनमध्ये Covid-19 चा पुन्हा उद्रेक; तब्बल 11 प्रांतांमध्ये पसरला संसर्ग, लॉकडाऊन लागू)

संशोधकांनी पुढे म्हटले की, जर लोकांनी रात्री 8 वाजल्यानंतर किंवा त्याच्या आसपास चाचणी केली तर चुकीचे परिणाम मिळण्याची शक्यता वाढते. ते म्हणाले, दुपारच्या वेळी पीक शेडिंगमध्ये, जेव्हा रुग्ण इतरांशी संवाद साधण्याची किंवा वैद्यकीय मदत घेण्याची अधिक शक्यता असते, तेव्हा रुग्णालये आणि एका मोठ्या समुदायामध्ये विषाणूचा प्रसार वाढविण्याची शक्यता असते. या संशोधनाचा वापर योग्य कोविड-19 चाचणी घेण्यासाठी आणि चाचणीची अचूकता सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो, असेही संशोधकांनी सांगितले.