कोविड-19 चा Delta पेक्षाही घातक Variant येण्याची शक्यता; तज्ञांचा सावधगिरीचा इशारा
जागतिक आरोग्य संघटनेनुसार कोविड-19 चा डेल्टा वेरिएंट आता 135 देशांमध्ये पसरल्याचे समोर आले आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 20 कोटींच्या पार होईल.
कोरोना व्हायरसचा डेल्टा वेरिएंट (Coronavirus Delta Variant) अनेक देशांमध्ये पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटने (World Health Organisation) नुसार कोविड-19 चा डेल्टा वेरिएंट आता 135 देशांमध्ये पसरल्याचे समोर आले आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 20 कोटींच्या पार होईल. यातच आता डेल्टा वेरिएंटपेक्षाही घातक वेरिएंट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेतील वरिष्ठ तज्ञ आणि अमेरिकन सरकारचे कोविड-19 सल्लागार डॉ. एंथनी फॉसी यांनी सांगितले की, पुढील कळात डेल्टा वेरिएंटपेक्षाही घातक वेरिएंट येण्याची शक्यता आहे.
डॉ. फासी यांनी सांगितले की, नवीन वेरिएंट अधिक घातक असू शकतो. त्यावर कोणत्याही लसीचा परिणाम होणार नाही, अशी ही संभावना आहे. अमेरिकेत ज्या प्रकारे संसर्ग पसरत आहे तसाच थंडीतही पसरत राहिल्यास तो वेरिएंट भयंकर आणि घातक रुप धारण करेल, असेही ते म्हणाले.
अशा परिस्थितीत लसीकरणाची प्रक्रिया वेळेत होणे गरजेचे आहे अन्यथा महामारी भयानक रुप धारण करेल. तसंच लसीकरण कमी झाल्यास संसर्ग पसरेल आणि व्हायरसला म्युटेशनची संधी मिळेल, असे डॉ. फॉसी यांनी सांगितले. (कोरोना विषाणूच्या Delta Variant ने वाढल्या चिंता; Chickenpox प्रमाणे अतिवेगाने पसरू शकतो संसर्ग- Report)
हा इशारा गंभीरपणे घेऊन नियमांचे पालन केल्यास फायदेशीर ठरेल. भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी अनलॉकनंतर गर्दी वाढण्याने संसर्ग वाढण्याचा धोकाही बळावतो. त्यामुळे लसीकरण तेजीने होणे गरजेचे आहे.
दरम्यान, आज भारतात मागील 24 तासांत 44,643 नवे कोरोना रूग्ण आढळून आले असून 464 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 41,096 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात 4,14,159 सक्रीय रुग्ण असून 49,53,27,595 जणांचे आतापर्यंत लसीकरण पूर्ण झाले आहे.