Coronavirus: कोरोना विषाणू महामारीचा अंत अद्याप दूर आहे, लस हे एकमेव शस्त्र नाही - WHO

आता आपण सलग सात आठवड्यांपासून संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ पाहत आहोत आणि मृत्यूचे प्रमाण चार आठवड्यांपासून वाढले आहे.’

WHO chief Tedros Adhanom Ghebreyesus. (Photo Credits: Getty Images)

जवळजवळ गेल्या दीड वर्षांपासून जगात कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घातले आहे. चीनच्या (China) वूहान शहरातून हा विषाणू जगभरात पसरला आहे. सध्या या विषाणूशी लढणारी लस उपलब्ध झाल्याने ही महामारी लवकरच संपेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे प्रमुख Dr Tedros Adhanom Ghebreyasus यांनी म्हटले आहे की, आतापर्यंत जगभरात कोविड-19 लसीचे 78 दशलक्षाहूनही जास्त डोस दिले असले तरी, या साथीचा अंत अद्याप दूर आहे. मात्र, सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भात कठोर पावले उचलून ही महामारी काही महिन्यांत नियंत्रित केली जाऊ शकते, असेही ते म्हणाले आहेत.

डिसेंबर 2019 मध्ये चीनमधील वुहान शहरात कोरोना विषाणूच्या संसर्गाची पहिली घटना नोंदवली गेली. आतापर्यंत जगभरात 13,65,00,400 लोक या विषाणूला बळी पडले आहेत. यापैकी 29,44,500 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डब्ल्यूएचओ प्रमुख म्हणाले, ‘जगभरात, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सलग सहा आठवड्यांपर्यंत संक्रमणाच्या घटनांमध्ये घट झाली होती. आता आपण सलग सात आठवड्यांपासून संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ पाहत आहोत आणि मृत्यूचे प्रमाण चार आठवड्यांपासून वाढले आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘गेल्या आठवड्यात संसर्गाच्या सर्वाधिक घटना समोर आल्या आहेत. आशिया आणि पश्चिम आशियाच्या अनेक देशांमध्ये कोरोना प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोविड-19 विरोधी लसीचे 78 कोटीपेक्षा जास्त डोस जगभरात देण्यात आले आहेत. लस एक शक्तिशाली शस्त्र आहे, परंतु हे एकमेव शस्त्र नाही.’ (हेही वाचा: नॉर्वेच्या पंतप्रधानांना COVID19 चे नियम मोडणे पडले महागात, पोलिसांनी ठोठावला 'इतका' दंड)

ते पुढे म्हणाले, ' कोरोनावर विजय मिळवण्यासाठी सामाजिक अंतर प्रभावी आहे. मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. व्हेंटिलेशन महत्वाचे आहे. लोकांची तपासणी करणे, संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेले लोक शोधून काढणे, विलगीकरण, यामुळे तुम्ही काही प्रमाणात विषाणूवर मात करू शकता. कोरोनाचा अंत अजून दूर आहे मात्र जगाकडे आशावादी राहण्याची अनेक कारणे आहेत.’