जपानमधील 'डायमंड प्रिन्सेस' क्रूझवरील आणखी एका भारतीय नागरिकाला कोरोनाचा संसर्ग

Coronavirus outbreak | photo used for representation Purpose (Photo Credits: Pixabay)

चीनमध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या (Corona virus) प्रादुर्भावामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. भारतात केरळ राज्यात काही दिवसांपूर्वी कोरोनाचे रुग्ण आढळले होते. जपानमधील योकोहामा बंदरावर उभ्या असलेल्या 'डायमंड प्रिन्सेस' (Diamond Princess) क्रूझवरील 100 पेक्षा जास्त भारतीय अडकले आहेत. या क्रूझरवर अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. येथे अडकलेल्या एका भारतीय नागरिकालाही कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

'डायमंड प्रिन्सेस' क्रूझरवरील 218 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या जहाजात 138 भारतीय अडकले आहेत. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापूर्वी क्रूझरवरील दोन भारतीय नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून आले आहेत. या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकार जपान सरकारच्या संपर्कात आहे. गेल्या काही दिवसांपासून जपानच्या योकोहामा बंदरावर डायमंड प्रिन्सेस ही क्रूझ उभी आहे. या क्रूझमधून शुक्रवारी 80 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या प्रवाशांना बाहेर येण्याची परवानगी देण्यात आली आहे. आतापर्यंत 11 जण क्रूझमधून बाहेर पडले आहेत. (वाचा - Coronavirus मुळे चीन मध्ये एका दिवसात 254 नागरिकांचा मृत्यू, 15 हजार जणांना संक्रमण)

कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये एका दिवसात 254 नागरिकांचा मृत्यू झाला असून 15 हजार जणांना त्याचा संसर्ग झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे हुबेई शहरात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. याबाबत जागतिक आरोग्य संघटनने गुरुवारी माहिती दिली आहे. गुरुवारी कोरोना व्हायरसची लागण झाल्याने 1367 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या व्हायरसची लागण झालेल्यांचा आकडा 59,804 वर गेला आहे.