Corona Outbreak in Australia: ऑस्ट्रेलियात कोरोनाचा स्फोट; क्रूझवरील तब्बल 800 प्रवासी पॉझिटिव्ह, जहाज मध्येच थांबले
2020 च्या सुरुवातीला याच कंपनीच्या रुबी प्रिन्सेस क्रूझ शिपमध्ये किमान 900 लोकांना कोरोना झाला होता, ज्यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला होता.
ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) एका दिवसात 8 हजारांहून अधिक नवीन रुग्णांसह कोरोनाचा स्फोट झाला आहे. न्यू साउथ वेल्समध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यामध्ये एका हॉलिडे क्रूझमध्ये (Cruise Ship) कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. या क्रूझवर 800 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर ही क्रूझ मध्यभागीच थांबवण्यात आली आहे. ही क्रूझ न्यूझीलंडहून निघणार होती. कार्निवल ऑस्ट्रेलियाची मॅजेस्टिक प्रिन्सेस क्रूझ सिडनीमध्ये डॉक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या क्रूझमध्ये 4600 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. राज्याच्या आरोग्य अधिकार्यांनी ऑस्ट्रेलियातील कोरोना प्रकरणांच्या या स्थितीचे वर्णन टियर 3 स्तर असे केले आहे, जे उच्च पातळीचे संक्रमण दर्शवते.
क्रूझ ऑपरेटर कार्निवल ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष मार्गुराइट फिट्झगेराल्ड यांनी सांगितले की, क्रूची 12 दिवसांची सहल होती परंतु 800 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर येथे खळबळ उडाली आहे. प्रवाशांसाठी प्रोटोकॉल ठेवण्यात आले आहेत आणि न्यू साउथ वेल्स हेल्थ क्रूझमधून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी धोरण विकसित करण्यास नेतृत्व करेल. न्यू साउथ वेल्स हेल्थनुसार, कोविड-पॉझिटिव्ह प्रवाशांना जहाजावर वेगळे केले जात आहे आणि वैद्यकीय कर्मचारी त्यांची काळजी घेत आहेत. एजन्सीने सांगितले की, ते प्रवासी आणि क्रू सदस्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी क्रूझ जहाज कर्मचार्यांसह काम करत आहे.
मार्गुराइट फिट्झगेराल्ड म्हणाले की सर्व प्रकरणे सौम्य किंवा लक्षणे नसलेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या बहुतेक लोकांमध्ये ओमिक्रॉन प्रकार आढळून आला आहे. 2020 च्या सुरुवातीला याच कंपनीच्या रुबी प्रिन्सेस क्रूझ शिपमध्ये किमान 900 लोकांना कोरोना झाला होता, ज्यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा 800 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. (हेही वाचा: वटवाघळाचं सूप प्यायल्याप्रकरणी थायलंडमधील महिलेला अटक; सोशल मीडियावर व्हायरल होतोय फूड ब्लॉगरचा 'हा' व्हिडिओ)
दुसरीकडे, भारतातील कोरोनाच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर, भारतात कोविड-19 चे 833 नवीन रुग्ण एका दिवसात समोर आले आहेत. देशात आतापर्यंत बाधित लोकांची संख्या 4,46,65,643 झाली आहे. त्याच वेळी, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 12,553 वर आली आहे. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अद्ययावत आकडेवारीनुसार, संसर्गामुळे आणखी आठ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 5,30,528 झाली आहे. कोविड-19 मुळे गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात दोन, छत्तीसगड, दिल्ली आणि कर्नाटकात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.