China: शेकडो विमान उड्डाणे अचानक रद्द, शाळा पुन्हा बंद; जाणून घ्या चीनवर पुन्हा लॉकडाऊनची वेळ का आली
ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, इनर मांगलियामध्ये कोरोना उद्रेकामुळे कोळशाच्या आयातीवर बंदी घातली जाऊ शकते
चीनमधील (China) अनेक शहरे आणि प्रांतांमध्ये शेकडो विमान उड्डाणे अचानक रद्द करण्यात आली आहेत. शाळा बंद करण्यात आल्या आहेत. गुरुवारी एका पर्यटकांच्या गटाने कोविड-19 (coronavirus) चा संसर्ग पसरल्याच्या संशयानंतर सरकारने हे आदेश दिले आहेत. सरकारने मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेण्याचेही फर्मानही जारी केले आहे. राजधानी बीजिंगने सीमा बंद केल्या आहेत आणि शून्य-कोविड धोरणाअंतर्गत काही भागात लॉकडाऊन लागू केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आरोप होत आहे की, चीनमधील स्थानिक संसर्गाची प्रकरणे दाबली जात आहेत.
दुसरीकडे देशाच्या उत्तर आणि वायव्य भागात कोरोना प्रकरणे सातत्याने वाढत आहेत. या नवीन संसर्ग प्रकरणाची लिंक एका वृद्ध जोडप्याशी संबंधित आहे, जे पर्यटकांच्या गटाचा भाग होते. हे लोकं शांघाय, शीआन, गांसु प्रांत आणि मंगोलियाच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या या प्रवासानंतर त्या-त्या प्रदेशातून कोरोना संसर्गाची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. राजधानी बीजिंगसह सुमारे पाच प्रांत आणि प्रदेशातील अनेक लोकांच्या संपर्कात हा पर्यटकांचा गट आला होता.
या खुलाशानंतर, अनेक शहरांच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेण्याची घोषणा केली आहे. सर्व पिकनिक स्पॉट्स, पर्यटन स्थळे, शाळा, सिनेमागृहे बंद करण्यात आली आहेत. अनेक भागात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. काही क्षेत्रांमध्ये आणि 40 लाख लोकसंख्येचे शहर असलेल्या लान्झोऊमध्ये (Lanzhou) लोकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यांना बाहेर जायचे आहे त्यांना त्यांचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागेल. दुसरीकडे विमानतळेही बंद करण्यात आली आहे, ज्यामुळे अनेक उड्डाणे प्रभावित झाली आहेत. (हेही वाचा: China: मुलांच्या गैरवर्तवणूकीची शिक्षा मिळणार पालकांना, चीनमध्ये बनवला जात आहे नवा कायदा)
इनर मंगोलियामध्ये सूचना प्रकाशित करण्यात आल्या आहेत की, शहरात येण्या-जाण्यावर बंदी आहे. ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, इनर मांगलियामध्ये कोरोना उद्रेकामुळे कोळशाच्या आयातीवर बंदी घातली जाऊ शकते, ज्यामुळे चीनमधील विजेचे संकट अधिक गडद होऊ शकते. दरम्यान, चीनमध्ये 82.5 टक्के लोकांनी सिंगल आणि 74.8 टक्के लोकांनी डबल कोरोना विषाणू लसचा डोस घेतला आहे.