China: ऑफिसमध्ये डुलकी घेतल्याने नोकरीवरून काढले; आता कंपनीला कर्मचाऱ्याला द्यावी लागणार 40 लाखांची भरपाई, जाणून घ्या काय आहे प्रकरण
कंपनीच्या या निर्णयाला झांग यांनी न्यायालयात आव्हान दिले. कोर्टात, कंपनीने कबूल केले की, झांगची झोप थकव्यामुळे आली होती, परंतु नोकरीवर झोपण्याच्या ‘शून्य-सहिष्णुतेच्या धोरणामुळे’ त्यांना काढून टाकले.
चीनमधील (China) एका कंपनीला कार्यालयात कामाच्या वेळेत झोप घेतल्याने कर्मचाऱ्याला काढून टाकणे महागात पडले. नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्याने कंपनीच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागितली. सुनावणीनंतर स्थानिक न्यायालयाने कर्मचाऱ्याच्या बाजूने निर्णय दिला आणि कंपनीला 350,000 युआन (अंदाजे 40 लाख रुपये) भरपाई देण्याचे आदेश दिले. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, चिनी नागरिक झांग हे तैक्सिंग शहरातील एका केमिकल कंपनीत गेल्या 20 वर्षांपासून काम करत होते. या वर्षाच्या सुरुवातीला, कंपनीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले की, झांग रात्री उशीरा शिफ्टमध्ये काम केल्यानंतर सुमारे एक तास झोपले होते.
झांग झोपल्याचे समोर आल्यानंतर कंपनीने त्यांना कामावरून काढून टाकले. कंपनीच्या या निर्णयाला झांग यांनी न्यायालयात आव्हान दिले. कोर्टात, कंपनीने कबूल केले की, झांगची झोप थकव्यामुळे आली होती, परंतु नोकरीवर झोपण्याच्या ‘शून्य-सहिष्णुतेच्या धोरणामुळे’ त्यांना काढून टाकले. कामगार संघटनेने या निर्णयाला मान्यता दिल्याचेही कंपनीने न्यायालयाला सांगितले.
झांग यांनी कंपनीचा निर्णय अन्यायकारक असल्याचे म्हटले आणि न्यायालयाकडून न्यायाची मागणी केली. सुनावणीनंतर न्यायालयाने कंपनीचा निर्णय चुकीचा मानला. झोपेसारख्या चुकीसाठी नोकरीतून काढून टाकणे हा अत्यंत कठोर निर्णय असल्याचे न्यायालयाने सांगितले. न्यायालयाने नमूद केले की, कंपन्यांना कामाच्या ठिकाणी नियम लागू करण्याचा अधिकार आहे, परंतु अशा कृती गुन्ह्याच्या प्रमाणात असणे आवश्यक आहे. झांगच्या डुलकीमुळे कंपनीचे कोणतेही नुकसान झाले नाही किंवा कोणतीही मोठी समस्या निर्माण झाली नाही, असे न्यायालयाने नमूद केले. (हेही वाचा: Bizarre Bank Policy: जपानी बँकेचे अजब धोरण; कर्मचाऱ्याने फसवणूक केल्यास करावी लागेल आत्महत्या)
न्यायाधीश म्हणाले की झांगने 20 वर्षांच्या सेवेत पहिल्यांदाच ही चूक केली आणि यामुळे कंपनीचे कोणतेही गंभीर नुकसान झाले नाही. न्यायालयाने झांग यांचा दोन दशकांचा निर्दोष रेकॉर्ड आणि त्यांना मिळालेल्या पदोन्नती लक्षात घेऊन कंपनीचा निर्णय चुकीचा ठरवला. न्यायालयाने कंपनीला 350,000 युआन (सुमारे 40 लाख रुपये) ची नुकसानभरपाई झांगला देण्याचे आदेश दिले.