IPL Auction 2025 Live

Chile Wildfires: चिलीच्या जंगलात लागलेली आग दाट लोकवस्तीच्या परिसरात पसरली; 112 लोकांचा मृत्यू, 1600 लोक बेघर, 200 जण बेपत्ता

अधिका-यांनी सांगितले की विना डेल मार आणि आसपासच्या भागात सुमारे 200 लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे.

Chile Wildfires (संग्रहित संपादित प्रतिमा)

Chile Wildfires: चिलीच्या जंगलात लागलेली भीषण आग (Chile Wildfires) दाट लोकवस्तीच्या परिसरात पसरली आहे. या आगीत गेल्या तीन दिवसांत सुमारे 112 लोकांचा मृत्यू झाला आहे. चिलीच्या मध्यवर्ती भागातील जंगलात दोन दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण आगीमुळे अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना खूप संघर्ष करावा लागत आहे. आगीमुळे गंभीर झालेल्या अनेक शहरांमध्ये प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. विना डेल मार शहराला आगीने वेढा घातला आहे, जिथे 1931 मध्ये स्थापित एक प्रसिद्ध वनस्पति उद्यान रविवारी ज्वाळांमध्ये नष्ट झाले.

आगीमुळे किमान 1,600 लोक बेघर झाले आहेत. विना डेल मारच्या पूर्वेकडील भागात अनेक भागात ज्वाला आणि धुराचे लोट पसरले असून काही लोक त्यांच्या घरात अडकले आहेत. अधिका-यांनी सांगितले की विना डेल मार आणि आसपासच्या भागात सुमारे 200 लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे.

सुमारे तीन दशलक्ष लोकसंख्या असलेले विना डेल मार हे शहर एक लोकप्रिय बीच रिसॉर्ट आहे आणि या ठिकाणी उन्हाळ्यात प्रसिद्ध संगीत महोत्सव आयोजित केला जातो. या घटनेबाबत राष्ट्राला संबोधित करताना, देशाचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक म्हणाले की, आगीतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची अपेक्षा आहे, अग्निशमन दल उच्च जोखमीच्या भागात पोहोचण्यासाठी संघर्ष करत आहे. बोरिक यांनी चिलीवासियांना बचाव कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. (हेही वाचा: Turkey Helicopter Crash: तुर्कीतील गझियानटेप प्रांतात हेलिकॉप्टर कोसळले; दोन पायलट ठार, एक जखमी)

आग झपाट्याने पसरत असून हवामानामुळे ती आटोक्यात आणणे कठीण झाले आहे. या ठिकाणाचे तापमान जास्त आहे, वारा जोरदार वाहत आहे आणि आर्द्रता कमी आहे. चिलीच्या गृहमंत्री कॅरोलिना तोहा यांनी सांगितले की, देशाच्या मध्यभागी आणि दक्षिणेकडील 92 जंगलांना आग लागली आहे, जेथे या आठवड्यात तापमान असामान्यपणे वाढले आहे. वालपरिसो परिसरात लागलेल्या भीषण आगीमुळे अधिकाऱ्यांनी लोकांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे. वालपरिसो परिसरात तीन निवारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. 2010 च्या भूकंपानंतर देश सर्वात वाईट आपत्तीचा सामना करत आहे.