Chile: व्यक्तीच्या खात्यात 43,000 पगाराऐवजी चुकून जमा झाले 1.42 कोटी; ताबडतोब राजीनामा देऊन झाला पसार
होय, या व्यक्तीच्या खात्यामध्ये कंपनीकडून 1.42 कोटी ट्रान्स्फर करण्यात आले होते.
आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, महिनाभर काम केल्यानंतर प्रत्येक कर्मचारी आपल्या पगाराच्या (Salary) तारखेची आतुरतेने वाट पाहत असतो. या दिवशी येणाऱ्या पगारावर पुढचा महिना अवलंबून असतो. इतकेच नाही तर अनेक वेळा महिन्याच्या शेवटच्या दिवसात लोकांचे पैसे संपतात, त्यामुळे अगदी काटकसरीत ते दिवस काढावे लागतात. अशाप्रकारे पगाराचे महत्व आपण सर्वजण जाणतो. या पगाराच्या दिवशी खात्यामध्ये किती रक्कम येणार याचा एक अंदाज आपल्याला असतो, मात्र अचानक या दिवशी खात्यामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम आली तर आपण काय कराल? कल्पना करणे थोडे अवघड आहे.
तर, गेल्या महिन्यात, चिलीमधील (Chile) एका कर्मचार्याच्या खात्यामध्ये त्याच्या पगारापेक्षा 286 पट जास्त रक्कम आली. होय, या व्यक्तीच्या खात्यामध्ये कंपनीकडून 1.42 कोटी ट्रान्स्फर करण्यात आले होते. ही गोष्ट लक्षात आल्यावर त्याने ताबडतोब राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि गायब झाला. ही व्यक्ती चिलीमधील कोल्ड कट्सच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक असलेल्या कॉन्सोरियो इंडस्ट्रियल डी एलिमेंटोस (सीअल) येथे काम करत होती.
स्थानिक माध्यमांनुसार, कंपनीने कर्मचाऱ्याला चुकून 500,000 पेसो (43,000 रुपये) ऐवजी 165,398,851 चिलीयन पेसो (रु. 1.42 कोटी) पाठवले. ही रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यात येताच त्याने राजीनामा दिला. त्यानंतर बँक खात्यातून पैसे काढून तो गायब झाला. पगाराच्या 286 पट जास्त रक्कम आपल्या एका कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात गेल्याचे कंपनीला कळाल्यावर त्यांनी कर्मचाऱ्यांना बोलावणे धाडले. फोनवर कर्मचार्याने नियोक्त्याला खात्री दिली की तो त्याच्या खात्यात हस्तांतरित केलेली जास्तीची रक्कम परत करेल. (हेही वाचा: फक्त 'बोअर' होत आहे म्हणून तरुणाने सोडली 3.5 कोटींची नोकरी, जाणून घ्या सविस्तर)
त्यानंतर कंपनीने त्याला बँकेत जाऊन कंपनीच्या नावाचे व्हाउचर तयार करण्यास सांगितले आणि त्याच्या पगारातून मिळालेली जास्तीची रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. कर्मचारी फोनवर यासाठी तयार झाला परंतु नंतर त्याने कंपनीचे फोन उचलणे बंद केले. आता तो बेपत्ता झाल्याचे बोलले जात आहे. त्याच्याकडून पैसे परत मिळवण्यासाठी कंपनी कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहे.