IPL Auction 2025 Live

Cannibal: मानवी मांस खाण्याची आवड; 23 वर्षीय नरभक्षक तरुणाला अटक, जीभ भाजून खाल्ली

मात्र त्यापूर्वी त्याने त्या माणसाची जीभ कापली व ती घरी नेली. त्याने ती बटरमध्ये शिजवून खाल्ली. रशियन मीडियाच्या वृत्तानुसार येगोरचा जन्म सेंट पीटर्सबर्ग येथे झाला होता

प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

जगात नरभक्षक (Cannibal) लोक आहेत यावर अजूनही बऱ्याच लोकांचा विश्वास नाही. परंतु मानवी शरीर खाणारे अनेक लोक, त्यांचे किस्से माध्यमांमध्ये आले आहेत. आता अंगाचा थरकाप उडवणाऱ्या अशाच एका नरभक्षक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीच्या कारमधून डोके नसलेले शरीर बाहेर पडल्यानंतर उत्तर रशियामध्ये (Northern Russia) त्याला अटक करण्यात आली. चौकशीमध्ये त्याने आपण नरभक्षक  असल्याची कबुली दिली आहे. रशियन मीडिया रिपोर्ट्सनुसार या व्यक्तीचे नाव येगोर कोमारोव (Yegor Komarov) असे असून तो फक्त 23 वर्षांचा आहे.

उत्तर रशियामधील सोर्टावाला या शहरातील एका रस्त्यावर येगोरच्या गाडीचा छोटा अपघात झाला. त्यावेळी त्याच्या गाडीतून डोके नसलेले धड बाहेर पडले. हा मृतदेह सेंट पीटर्सबर्ग येथील एका 50 वर्षीय व्यावसायिकाचा असल्याचे समजते. येगोरच्या कारमधून पोलिसांना कुदळ, दोरी आणि पोती आढळली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यावसायिकाचा येगोरसोबत वाद झाला होता, त्यानंतर येगोरने त्याची हत्या केली. पुढे त्याचा मृतदेह जंगलात दफन करण्याची येगोरची योजना होती.

चौकशीदरम्यान, येगोरने ‘आपल्याला लोकांना मारायला आवडते’ असे विधान केले. मानवी मांस चाखायची तलफ झाल्याने त्याने गेल्या वर्षी सेंट पीटर्सबर्ग येथील एका उद्यानात एका 38 वर्षीय व्यक्तीला भोसकून ठार केल्याचेही कबूल केले. या हल्ल्याबद्दल बोलताना, तो म्हणाला, ‘जेव्हा तो मेला, तेव्हा मी त्याची मान कापली आणि त्याचे रक्त आणि मांस चाखले. परंतु चाकू बोथट असल्याने मांस कापायला अवघड होते. तसाही मला त्याच्या नसांची चव आवडली नाही.’

येगोरने जवळच्या ड्रेनेज पाईपमध्ये या 38 वर्षीय व्यक्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. मात्र त्यापूर्वी  त्याने त्या माणसाची जीभ कापली व ती घरी नेली. त्याने ती बटरमध्ये शिजवून खाल्ली. रशियन मीडियाच्या वृत्तानुसार येगोरचा जन्म सेंट पीटर्सबर्ग येथे झाला होता आणि तो एका धर्मादाय अपार्टमेंटमध्ये त्याचे पालक आणि आजीसोबत राहत होता. पोलिसांनी येगोरसोबत अजून 2 व्यक्तींना अटक केली आहे.