Rishi Sunak Sacks Several Ministers: ब्रिटीश पंतप्रधान होताच ऋषी सुनक अॅक्शन मोडमध्ये; अनेक मंत्र्यांना केले बडतर्फ

किंबहुना जुन्या लोकांनी केलेल्या चुका सुधारण्यासाठी आपली निवड झाल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते.

Rishi Sunak (Photo Credit - Twitter)

Rishi Sunak Sacks Several Ministers: ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही तासांतच ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी अनेक मंत्र्यांची हकालपट्टी केली. मात्र, जेरेमी हंट हे ब्रिटनचे अर्थमंत्री म्हणून कायम राहतील. मंत्र्यांना बडतर्फ करण्यापूर्वीच सुनक यांनी यासंदर्भात संकेत दिले होते. किंबहुना जुन्या लोकांनी केलेल्या चुका सुधारण्यासाठी आपली निवड झाल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. राजा चार्ल्स II यांच्या भेटीनंतर तासाभरात सुनक यांनी आपले वचन पूर्ण करण्यास सुरुवात केली. कोणताही विलंब न लावता ‘काम ताबडतोब सुरू होईल,’ असे त्यांनी सांगितले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांना त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाच्या घोषणेपूर्वी राजीनामा देण्यास सांगितले आहे. आतापर्यंत तीन मंत्र्यांना पायउतार होण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये बिझनेस सेक्रेटरी जेकब रीस-मोग, जस्टिस सेक्रेटरी ब्रँडन लुईस आणि डेव्हलपमेंट मिनिस्टर विकी फोर्ड यांचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले. जेरेमी हंट अर्थमंत्री म्हणून कायम राहतील, असे अहवालात म्हटले आहे. (हेही वाचा -Rishi Sunak यांनी स्वीकारला ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा कारभार; King Charles III यांच्याकडूनही शिक्कामोर्तब)

दरम्यान, मंगळवारी महाराजा चार्ल्स तिसरा यांची भेट घेतल्यानंतर सुनक यांनी भारतीय वंशाचे पहिले ब्रिटिश पंतप्रधान म्हणून औपचारिकपणे पदभार स्वीकारला आहे. यावेळी त्यांनी असे सांगितले की, त्यांच्या पूर्वीच्या शासनकर्त्यांच्या चुका सुधारण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. ब्रिटनचे माजी अर्थमंत्री सुनक हे हिंदू आहेत आणि ते गेल्या 210 वर्षांतील ब्रिटनचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.

पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थान 10 डाउनिंग स्ट्रीटच्या बाहेर, सुनक म्हणाले की ते देशासमोरील गंभीर आर्थिक संकटाला सहानुभूतीपूर्वक सामोरे जातील आणि प्रामाणिक, व्यावसायिक आणि जबाबदार सरकारचे नेतृत्व करतील. त्यांचे पूर्ववर्ती लिझ ट्रस यांनी केलेल्या चुका सुधारण्यासाठी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा नेता आणि पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे.