Boris Johnson Booze Party: इंग्लंडमध्ये Covid-19 चा हाहाकार; नियम धुडकावून पंतप्रधान बोरिस जॉन्सन करत होते दारू पार्टी
आयटीव्ही चॅनलने मे 2020 मधील पंतप्रधानांच्या गार्डन पार्टीचे निमंत्रण इमेल प्रकाशित केले. त्यानंतर आता विरोधी नेत्यांनी याबाबत तपासाची मागणी केली आहे.
गेल्या दीड ते पावणे दोन वर्षांपासून जगभरात कोरोना विषाणूने (Coronavirus) हाहाकार माजवला आहे. या विषाणूवर मात करण्यासाठी अनेक देशांनी निर्बंध लागू केले आहेत. परंतु आपल्या देशातील लोकांवर कठोर निर्बंध लादणारा देशाचा प्रमुख, स्वतःच कोरोना नियमांचे उल्लंघन करत असेल तर? तुम्हाला कसे वाटेल? तुम्हाला नक्कीच वाईट वाटेल आणि रागही येईल. असाच काहीसा प्रकार ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या बाबतीत घडला आहे. एका रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की, लॉकडाऊन दरम्यान ते एका ड्रिंक पार्टीला (Drink Party) गेले होते. आता अनेक माध्यमांनी याबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.
बोरिस जॉन्सनचे माजी सहाय्यक डॉमिनिक कमिंग्स यांनी दावा केला आहे की, लॉकडाउन नियमांचे उल्लंघन करून डाउनिंग स्ट्रीट गार्डनमध्ये पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला बोरिस जॉनसन आणि त्यांच्या पत्नीने उपस्थिती दर्शवली होती. डॉमिनिक यांनी त्यांच्या ब्लॉगवर एक फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये यूकेचे पंतप्रधान बोरिस जॉनसन दिसत आहेत. या फोटोद्वारे त्यांनी दावा केला आहे की, हा 15 मे 2020 चा फोटो आहे. त्यावेळी यूकेमध्ये लॉकडाऊन लागू होते, परंतु बोरिस जॉन्सन यांनी नियम बेकिंग पार्टीला हजेरी लावली होती.
यासोबतच त्यांनी असा आरोप केला आहे की जॉन्सन यांनी डिसेंबर 2020 मध्ये पार्टीबद्दल खोटे बोलले आणि मीडियाला खोट्या बातम्या चालवण्यास भाग पाडले. आयटीव्ही चॅनलने मे 2020 मधील पंतप्रधानांच्या गार्डन पार्टीचे निमंत्रण इमेल प्रकाशित केले. त्यानंतर आता विरोधी नेत्यांनी याबाबत तपासाची मागणी केली आहे. (हेही वाचा: 'टिप-टिप बरसा पानी'वर पाकिस्तानच्या खासदाराने केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ)
हा मेल पंतप्रधानांचे खाजगी सचिव मार्टिन रेनॉल्ड्स यांच्या वतीने अनेकांना पाठवण्यात आला होता. कार्यक्रमाची तारीख 20 मे 2020 अशी नमूद करण्यात आली आहे. त्याच दिवशी, एका दूरचित्रवाणी पत्रकार परिषदेत सरकारने लोकांना आठवण करून दिली होती की, लोक फक्त एका व्यक्तीला भेटण्यासाठी घराबाहेर पडू शकतात. याबाबत जॉन्सन यांनी म्हटले आहे की, त्यांनी वैयक्तिकरित्या कोणतेही नियम मोडले नाहीत, परंतु बीबीसी आणि इतर माध्यमांनी मंगळवारी बातम्या प्रसिद्ध केल्या की पंतप्रधान आणि त्यांची पत्नी कॅरी जॉन्सन यांनी मे 2020 च्या गार्डन पार्टीत सहभाग नोंदवला होता.